नवी दिल्ली, 19 डिसेंबर : जगप्रसिद्ध भारतीय संगीतकार, गीतकार आणि गायक ए. आर. रहमान यांनी तयार केलेलं 'वंदे मातरम्' हे गाण्याचं व्हर्जन बहुतांश भारतीयांना माहिती आहे. अनेकांना हे गाणं आवडतंही. ईशान्य भारतातील 'ऑक्टेव्ह' नावाच्या बँडनं हे गाणं रिएडिट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (18 डिसेंबर) ईशान्येकडील मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांचा दौरा केला. पारंपरिक पोशाखातील मोदींसमोर ऑक्टेव्हनं आपलं 'वंदे मातरम्' गाणं सादर केलं.
एका कार्यक्रमात मोदी या गाण्याचा आनंद घेताना दिसले. या गाण्याचा व्हिडिओ पीए मोदींनी त्यांच्या यूट्युब चॅनलवरून शेअर केला आहे. त्यांच्याबरोबरच भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडियावर या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
"ईशान्येतील ऑक्टेव्ह बँडनं केलेलं 'वंदे मातरम' गाण्याचं सुंदर सादरीकरण!" अशा कॅप्शनसह पंतप्रधानांच्या यूट्यूब चॅनेलवर जवळपास तीन मिनिटांची व्हिडिओ क्लिप पोस्ट करण्यात आली आहे. संबित पात्रा, पूर्णेश मोदी आणि डॉ. के. के. लक्ष्मण या भाजप नेत्यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे. 'ऑक्टेव्ह' हे नाव ईशान्येकडील, आसाम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर आणि सिक्कीम या आठ राज्यांना उद्देशून ठेवलं गेलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांचा दौरा केला. या ठिकाणी पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत. या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सहा हजार 800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं.
ईशान्य भारतातील आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी नोडल एजन्सी असलेल्या नॉर्थ ईस्ट कौन्सिलचा (एनईसी) सुवर्ण महोत्सव (50 वर्षे) साजरा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोदी आले होते. या महत्त्वाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "सरकारनं आता 'लूक ईस्ट' आणि 'अॅक्ट ईस्ट' या धोरणात बदल करून 'अॅक्ट फास्ट फॉर नॉर्थ ईस्ट' आणि 'अॅक्ट फर्स्ट फॉर नार्थ ईस्ट' असं धोरण विकसित केलं आहे.
हेही वाचा - कुणी IAS तर कुणी IPS, या गावाला प्रशासकीय अधिकाऱ्यांची फॅक्टरी का म्हणतात?
"ईशान्य भारत, म्यानमार आणि थायलंडला रस्त्यांद्वारे जोडून अधिक चांगला संपर्क आणि संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे," असं पंतप्रधान मोदींनी त्रिपुरातील भाषणात सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra modi, Pm modi, Video clip