नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : सध्याच्या काळात आपल्या दैनंदिन जीवनात सोशल मीडियाचा (Social Media) मोठ्या प्रमाणात वरचष्मा आहे. दररोज शेकडो गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या जातात. अनेक जण आपल्या अकाउंटवर आलेल्या गोष्टी शेअर (Share) आणि फॉरवर्ड (Forward) करताना मागचा-पुढचा विचार करत नाहीत. त्याची सत्यता पडताळून पाहण्याचे कष्टदेखील घेतले जात नाहीत. परिणामी अनेक अनावश्यक व चुकीच्या गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होतात. यातून कधी-कधी फसवणूक होण्याची देखील शक्यता असते. सध्या सोशल मीडियावर एका सरकारी योजनेबाबत एक मेसेज व्हायरल (Viral Message) होत आहे. कोरोनाशी (Corona) लढण्यासाठी सरकार 4 हजार रुपये मदत करत असल्याचा दावा या व्हायरल मेसेजमध्ये केला जात आहे. सोशल मीडियात व्हायरल होणारा हा मेसेज खोटा असल्याचं पीआयबी अर्थात प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. त्या मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे, की ‘कोरोनाच्या परिस्थितीमुळे सरकार नागरिकांसाठी ‘पंतप्रधान रामबाण सुरक्षा योजना’ घेऊन येत आहे. मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्ट्रेशन केलेल्या सर्व तरुणांना या योजनेचा लाभ घेता येईल. रजिस्ट्रेशन केलेल्या तरुणांना 4 हजार रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे.’ सरकारच्या नावाने अशा प्रकारचा मेसेज व्हायरल होत असल्याची माहिती मिळताच प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोने (PIB) या प्रकरणाची दखल घेतली आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर 4 हजार रुपये मदत मिळणार असल्याचा दावा करणारा मेसेज आणि त्यात उल्लेख केलेली वेबसाइट दोन्ही बनावट असल्याचं पीआयबीनं स्पष्ट केलं आहे.
वाचा : जगातील सर्वात मोठ्या लसीकरणासाठी फायदेशीर ठरलं Co-WIN App पीआयबीनं आपल्या फॅक्ट चेकमध्ये ट्विटरवर व्हायरल मेसेजचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. आपल्याला या योजनेतून चार हजार रुपये मिळाल्याचा दावा मेसेजमध्ये करण्यात आला आहे; मात्र हा मेसेज बनावट असून, त्यात दिलेली माहिती चुकीची आहे. सरकारच्या नावाखाली होत असलेल्या फसवणुकीपासून नागरिकांनी सतर्क राहिलं पाहिजे. आमिषांना बळी पडून कुठल्याही बनावट वेबसाइटवर आपलं रजिस्ट्रेशन करू नये, असं आवाहन पीआयबीनं केलं आहे. तुम्हाला देखील पंतप्रधान रामबाण सुरक्षा योजनेबाबत एखादा मेसेज आला असेल तर त्यावर कुठल्याही प्रकारची माहिती भरू नका आणि तो तत्काळ डिलीट करा आणि फॉरवर्डही करू नका. अशा प्रकारच्या अन्य मेसेजेबाबतही सावधानता बाळगा