अयोध्या, 19 सप्टेंबर : तुम्ही खूप चाहते पाहिले असतील, पण मुख्यमंत्र्यांचे मंदिर बांधणारे असे चाहते फार कमी पाहिले असतील. मात्र, हे खरे आहे. रामनगरी अयोध्येत असाच प्रकार घडला. अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू असताना एका तरुणाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मंदिर बाधले आहे. तसेच त्यांची पुजाही सुरू केली आहे. हे मंदिर रामजन्मभूमीपासून सुमारे 25 किमी अंतरावर प्रयागराज महामार्गावरील कल्याण भदरसा गावातील मजरे मौर्यच्या पुरवामध्ये बांधले आहे. ज्या दिवशी राम मंदिराची भूमिपूजा झाली, त्याच दिवशी म्हणजे 5 ऑगस्ट 2020 रोजी याच गावात योगींच्या मंदिराचा पाया रचला गेला, अशी माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ हे सलग दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता कोणापासून लपलेली नाही. विशेषत: राज्यातच नव्हे तर देशभरात राहणारे तरुण वर्ग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आपले आयकॉन मानतात. सोशल मीडियावरही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. पण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या स्वप्ननगरी असलेल्या अयोध्येत त्यांचा असा चाहता आहे, ज्याने चक्क त्यांना देवाचा दर्जा दिला आणि त्यांचे मंदिर बांधले आहे. आता या मंदिरात रोज त्याची पूजा केली जाते. इतकंच नाही तर हा भक्त स्वतःला सीएम योगींचा प्रचारक असल्याचे सांगतो. तसेच त्यांच्यासाठी गाणी लिहितो आणि गातो. ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हे खरं आहे की अयोध्येत राम मंदिराचं बांधकाम पूर्ण होण्याआधीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मंदिर बांधले गेले आहे आणि आता याठिकाणी रोज आरती आणि पूजा केली जात आहे. प्रभाकर मौर्य असे या तरुणाचे नाव आहे. तो शहराला लागून असलेल्या दसौधा ब्लॉकमध्ये असलेल्या कल्याण भदरसा येथील मौर्य का पूर्वा येथील रहिवासी आहे. प्रभाकर मौर्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्याने इतका प्रभावित झाला आहेत की तो स्वतः सीएम योगी यांच्यासारखे कपडे घालतो. इतकेच नाही तर प्रभाकर मौर्य याने सीएम योगी आदित्यनाथ यांच्या नावाने आरतीही केली जाते. सीएम योगींनी प्रभाकर मौर्य यांचा सत्कारही केला आहे.
प्रभाकर मौर्य म्हणतात की, ते भगवान रामाचे अनन्य भक्त आहेत आणि त्यांनी शपथ घेतली होती की जो कोणी अयोध्येत रामाचे मंदिर बांधेल, तो त्याचे मंदिर बांधून त्याची पूजा करेल. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाली, तेव्हा त्यांचा संकल्प पूर्ण करून त्यांनी 5 ऑगस्ट 2020 रोजी या मंदिराच्या उभारणीचे काम सुरू केले, असे त्याने सांगितले. आता याठिकाणी रोज आरती आणि पूजा केली जात आहे. अयोध्येतील संत समाज काय म्हणाला? अयोध्येतील संत समाजानेही योगी यांच्या मंदिराचे स्वागत आणि समर्थन केले आहे. हरिधाम पीठाचे पीठाधीश्वर जगतगुरू राम दिनेश आचार्य म्हणाले की, या देशात प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. भावनेनुसार गुरू आणि संत यांना ईश्वर उपाधी बहाल करण्याचा अधिकार आहे. भगवान रामाने ज्याप्रमाणे दुष्टांचे अत्याचार संपवून रामाचे राज्य स्थापन केले, त्याच भावनेने प्रेरित होऊन या तरुणाने योगीजींचे मंदिर उभारले आहे. आम्ही त्याच्या भावनेचा आदर करतो. तर तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंसाचार्य म्हणाले की, सनातन धर्मात भगवंतापेक्षा देवाचे भक्त मोठे असल्याचे सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर जगतगुरु परमहंसाचार्य म्हणाले की योगींची रामभक्ती पाहता वेगवेगळ्या ठिकाणी योगी आणि मोदींचे मंदिर बांधले पाहिजे. जिथे देव आहे तिथे भक्तही असले पाहिजेत.