कानपूर, 30 जुलै : कानपूरमधल्या (Kanpur) हंसपुरम नौबस्ता परिसरातील कॉल सेंटरच्या (Call Center) माध्यमातून परदेशी नागरिकांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या (Crime Branch) पथकानं जेरबंद केलं आहे. या टोळीने आतापर्यंत कर्जाच्या (Loan) माध्यमातून 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याचं स्पष्ट झालं आहे.
कानपूरमधील हंसपुरम नौबस्ता परिसरातील एका कॉल सेंटरवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. परदेशी नागरिकांना होम लोन आणि पर्सनल लोनचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा त्यांनी पर्दाफाश केला. हे कॉल सेंटर इंटर आणि बीएससीचे विद्यार्थी चालवत होते. गुरुवारी रात्री पावणे तीन वाजता केलेल्या कारवाईत या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने परदेशी नागरिकांची सुमारे 80 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचं आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांवरून स्पष्ट होत असल्याचं गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. घटनास्थळावरून अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची ओळख पटली असून, त्यापैकी रवि शुक्ला हा हंसपुरम नौबस्ता येथील रहिवासी असून, विशाल सिंह सेंगर हा गृहनिर्माण विकास हंसपुरम नौबस्ता येथील रहिवासी आहे, असं वृत्त दैनिक भास्करने दिलं आहे.
काकादेव येथील एका कॉल सेंटरची चौकशी करताना या कॉल सेंटरची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला. या वेळी आरोपींकडून 5 हार्ड डिस्क, 1 लॅपटॉप, 2 मोबाइल जप्त करण्यात आले. तसंच लॅपटॉपमध्ये 2.50 लाख परदेशी नागरिकांचा डेटा (Data) आणि कर्ज देणाऱ्या अमेरिकी कंपन्यांचा फॉर्म फॉरमॅटही पोलिसांना मिळाला आहे.
अमेरिकी नागरिकांना कॉल करण्याकरिता व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलचा (VOIP) वापर केला जात होता. यासाठी एक्सटेन आणि एक्सलाइफ या दोन अॅपचा आणि टेक्स्ट नाऊ सोनोटेलचा, तसंच सॉफ्टफोन डायलरचा वापर होत होता. या माध्यमातून फोनवर संवाद साधला जात असल्याचं तपासात स्पष्ट झालं. इंग्रजी बोलण्यात पटाईत असलेल्यांना या कामावर घेतलं जाई. ते अमेरिकेतल्या नागरिकांशी तिथल्या भाषेत संवाद साधत. यातून ज्या व्यक्ती यांच्या जाळ्यात अडकत त्याच्याकडून ते सर्वप्रथम फीच्या नावाखाली 300 ते 500 डॉलर, क्लोजिंग कॉस्टच्या नावावर कर्ज रकमेच्या दोन टक्के रक्कम, अॅडव्हान्स रिपेमेंटच्या नावाखाली 800 ते 900 डॉलर आणि कर्जच्या विम्यासाठीही काही रक्कम वसूल करत होते. काही लोक कर्ज रद्द करत होते, तेव्हा त्यांच्याकडून हे आरोपी कॅन्सलेशन फी वसूल करत.
पेमेंटसाठी ही टोळी क्रिप्टोकरन्सीच्या ( Cryptocurrency) अॅपचा वापर करून बिटकॉइन स्वरूपात पैसे घेत होती. गिफ्ट कार्ड स्वरूपातही पेमेंट स्वीकारलं जाई. काही पेमेंट अकाउंटमधून ट्रान्सफर होत. नोएडातील एक व्यक्ती या अॅपच्या माध्यमातून आलेले पैसे आरोपींच्या खात्यात इन कॅश करे. अमेरिकी नागरिकांना फसवणुकीची शंका येताच ते कॉल करत. परंतु त्यांचे क्रमांक तोपर्यंत आरोपींकडून ब्लॉक केलेले असायचे.
या प्रकरणातील आरोपी रवी हा त्याच्या मामाच्या घरात हे कॉल सेंटर चालवत होता. अमेरिकी नागरिकांना कमी व्याजदराने होम लोन (Home Loan) किंवा पर्सनल लोन (Personal Loan) देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जात होती, असं तपासात आढळून आलं. दिल्लीतल्या मास्टरमाइंडने कानपूरमध्ये अशा कॉल सेंटर्सचं जाळं पसरवले असून, त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखेचं पथक दिल्लीला रवाना झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kanpur