हैदराबाद, 25 जुलै: कोरोनाच्या संकाटात आणखी एका आस्मानी संकट ओढवलं आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं पुराची स्थिती निर्माण झाली आहे. कुठे गावांचा संपर्क तुटला तर कुठे वाहतूक ठप्प झाली तर कुठे पुराची स्थिती आहे. अशातच एका गावातील पूल वाहून गेल्यानं गर्भवती महिलेचे हाल झाल्याचं पाहायला मिळालं. याआधी महाराष्ट्रात गर्भवती महिलेला रस्ते आणि वाहतुकीची सुविधा नसल्यानं 28 किलोमीटर चालायला लागलं होतं. तेलंगणा इथल्या गुंडला भागात धुवांधार पाऊस झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली. नदीवरचा पूल वाहून गेल्यानं चिंता निर्माण झाली. याचदरम्यान गर्भवती महिलेला रुग्णालयात जायचं असल्यानं नदी कशी ओलांडायची हा प्रश्न निर्माण झाला. पूल वाहून गेल्यानं कोणतीही मदत मिळण्याची शक्यता अगदी कमी होती. अशावेळी गावातील काही सदस्य आणि नातेवाईकांनी पुढे येऊन या महिलेची मदत केली.
हे वाचा- मुंबईची लोकल सेवा पूर्णपणे कधी सुरू होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर काही लोकांनी या महिलेला खांद्यावरून उचलून नेत नदी पार केली आणि रुग्णालयात दाखल केलं. या महिलेला प्रसूती कळा येत असल्यानं रुग्णालयात तातडीनं दाखल करणं गरजेचं होतं. आरोग्य विभागाला यासंदर्भात माहिती देण्यात आली मात्र त्यांच्याकडून पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं वेळेत मदत मिळू शकली नाही असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. वेळ दवडण्याऐवजी नातेवाईक आणि काही नागरिकांनी या गर्भवती महिलेला कंबरेएवढ्या पाण्यातून खांद्यावरुन नेत रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

)







