नवी दिल्ली, 10 मार्च : होळी सणाच्या एक दिवस आधी म्हणजेच 7 मार्च रोजी सीबीआयचं पथक बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि यूपीए सरकारमधील माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव यांची जमिनीच्या बदल्यात नोकरी देणं या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांच्या मुलीच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी गेलं होतं. पण ज्यावेळी सीबीआयचं पथक डॉ. मीसा भारती यांच्या निवासस्थानी दाखल झालं, त्याचवेळी घरातील एका सदस्याने पटकन `डॉलर आत टाका` असं सांगितलं. डॉलरचं नाव ऐकताच सीबीआय पथकाने कान टवकारले. पण थोड्यावेळाने डॉलर पाहताच सीबीआयच्या पथकाला घाम फुटला आणि पथकातील अधिकारी घाबरून गेले. खरं तर डॉलर हे मीसा भारती यांच्या पाळीव कुत्र्याचं नाव आहे. डॉलरवर संपूर्ण कुटुंब खूप प्रेम करतं. काळ्या रंगाचा डॉलर हा त्यांच्या कुटुंबातील अत्यंत लाडक्या सदस्यासारखा आहे. यादव कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून प्रेम आणि आपुलकीने डॉलरचा सांभाळ करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या वेळी या पाळीव कुत्र्याला घरी आणलं गेलं. त्यावेळी लालूप्रसाद यादव यांच्यासह त्यांचं संपूर्ण कुटुंब सीबीआय आणि ईडीच्या तपासामुळे माध्यमांमध्ये चर्चेत होतं. या कारणास्तव प्रेमाने लालूप्रसाद यादव यांनी हसतहसत त्या पाळीव कुत्र्याचं नाव डॉलर ठेवलं होतं. हे नाव ऐकून त्यांच्या कुटुंबियांना हसू आवरलं नाही. नंतर मीसा भारती आणि त्यांचे कुटुंबीय त्याला याच नावाने हाक मारू लागले. डॉलरदेखील त्याच्या नावाने इतका परिचित झाला आहे की त्याचं नाव ऐकताच तो शेपूट हलवत तुमच्याकडे येतो असं माहीतगारांनी सांगितलं. वाचा - जम्मूमध्ये श्रद्धासारखे हत्याकांड, डॉक्टर सुमेधावर प्रियकर जौहरने केले सपासप वार लालूप्रसाद यादव आणि डॉ. मीसा भारती हे प्राणीप्रेमी आहेत. गाय, म्हैस किंवा शेळी असो या कुटुंबाने बिहारमधील त्यांच्या घरात अनेक प्राणी पाळले आहेत. मीसा भारती यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, ``काही वर्षांपूर्वी त्यांनी दोन अतिशय गोंडस पाळीव कुत्रे दिल्लीतील शासकीय निवासस्थानी आणले होते. परंतु मीसाच्या दुसऱ्या बहिणीने यापैकी एक कुत्रं सोबत नेलं.`` जेव्हा त्यांच्या कुटुंबियांना दुसऱ्या पिल्लाचं नाव विचारण्यात आलं, तेव्हा लालूप्रसाद यांचे नातेवाईक हसू लागले. ``तुम्ही डॉलर पाहिला आहे. दुसऱ्या कुत्र्याचं नावदेखील असंच खास आहे, पण आम्ही ते सांगू शकत नाही, ``असं त्यांनी सांगितलं. हे ऐकताच सीबीआयच्या तपासामुळे गंभीर झालेलं वातावरण काहीसं हलकं-फुलकं झालं. यामुळे सीबीआयचं पथक गंमतीने हसलं. सीबीआयचे आधिकारी आणि पत्रकारांनी डॉलर कडे पाहून हसतहसत लालू प्रसाद यांच्या घरात प्रवेश केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.