नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर : भारतीय कला आणि संस्कृती पुरातन वारसा असलेली आणि वैविध्यपूर्ण आहे. भारतातच नाही, तर जगभरात भारतीय कलेचं कौतुक होतं. आतापर्यंत अनेक भारतीय कलावंतांना परदेशातले मोठे पुरस्कार मिळाले आहेत. आता यात आणखी एका नावाची भर पडली आहे. भारतातले प्रसिद्ध बासरीवादक पंडित शशांक सुब्रह्मण्यम यांना नुकताच फ्रान्समधला फ्रेंच नाइटहूड हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘आज तक’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. फ्रेंच नाइटहूड (Chevalier de l’Ordre des et des Lettres) हा फ्रान्सचा राष्ट्रीय पुरस्कार आहे. भारतीय बासरीवादक आणि संगीत नाटक अकादमीचे वरिष्ठ पुरस्कार विजेते पंडित शशांक सुब्रह्मण्यम यांना यंदा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या क्षेत्रात त्यांची 35 वर्षांची साधना आहे. यामुळेच फ्रान्स सरकारनं त्यांना या पुरस्कारानं गौरवलं आहे. पंडित शशांक सुब्रह्मण्यम यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1978 रोजी कर्नाटकमधल्या रुद्रपटना या गावी झाला. अवघ्या 6 वर्षांचे असताना 1984मध्ये त्यांनी वादनाला सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत 3 दशकं त्यांचं संगीत क्षेत्रात योगदान आहे. याआधी त्यांना इतर पुरस्कारही मिळाले आहेत. शशांक सुब्रह्मण्यम यांना 2009 मध्ये गिटारवादक जॉन मॅकलॉघलिन यांच्यासोबत एका सीडी अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्काराचं नामांकन मिळालं होतं. संगीत नाटक अकादमीतर्फे दिला जाणारा भारत सरकारचा 2017चा सर्वोच्च पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना मिळाला आहे. त्याशिवाय 1995 आणि 1997 मध्ये रोटरी क्लबतर्फे उत्कृष्टता पुरस्कार मिळाला आहे. सुब्रह्मण्यम 14 वर्षांचे असताना 1993 मध्ये त्यांना ऑल इंडिया रेडिओ आणि टीव्हीमध्ये ए श्रेणी मिळाली होती. तसंच काही पुरस्कारही मिळाले होते. पंडित सुब्रह्मण्यम यांनी देशातच नाही, तर ऑस्ट्रेलिया, मलेशिया, क्वालालंपूर, सिंगापूर आदी ठिकाणीही कार्यक्रम केले आहेत. कर्नाटकी संगीत व बासरीवरचं त्यांचं प्रभुत्व वाखाणण्यासारखं आहे. हेही वाचा - कोण आहेत पत्रकार इसुदान गढवी? ज्यांना AAP ने गुजरात निवडणुकीत बनवलंय CM पदाचा चेहरा पंडित शशांक सुब्रह्मण्यम यांच्याआधीही भारतीय शास्त्रीय संगीतातल्या काही कलाकारांना फ्रान्स सरकारचा हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्यात भारतरत्न लता मंगेशकर, पं. हरिप्रसाद चौरसिया, डॉ. एम. बालमुरलीकृष्ण यांचा समावेश आहे. आता या पुरस्कारासाठी पंडित शशांक सुब्रह्मण्यम यांची निवड झाली आहे. येत्या काही दिवसांत हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाईल. या पुरस्कारामुळे भारताच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.