मुंबई, 25 जानेवारी : देशातील सर्वोच्च आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जणाऱ्या पद्म पुरस्काराची घोषणा झाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्राने पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये 6 जणांना पद्म विभूषण, 9 जणांना पद्म भूषण आणि 91 जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील 12 दिग्गजांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. यात तबलावादक झाकीर हुसेन आणि अभिनेत्री रवीना टंडनचा समावेश आहे. झाकीर हुसेन यांना पद्म विभूषण, तर रवीना टंडनला पद्मश्री जाहीर करण्यात आला आहे.
कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यक, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, समाज कार्य, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यांसह विविध क्षेत्रांत असामान्य कामगिरी किंवा सेवांसाठी हे पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात.
1. पद्मविभूषण: असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी.
2. पद्मभूषण: उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी.
3. पद्मश्री: विशिष्ट सेवेसाठी.
हे वाचा - कॉल सेंटरमध्ये काम करणारा मुलगा ते IPS अधिकारी, संघर्षाला नशिबानेही दिली साथ
महाराष्ट्रातील पद्म पुरस्काराचे मानकरी
झाकीर हुसेन - पद्म विभूषण
सुमन कल्याणपुर - पद्मभूषण
कुमार मंगलम बिर्ला - पद्मभूषण
विज्ञान क्षेत्रातून दीपक धार - पद्मभूषण
भिकू रामजी इदाते - पद्मश्री
राकेश झुनझुनवाला यांना मरणोत्तर पद्मश्री
साहित्य आणि शिक्षण - प्रभाकर मांडे - पद्मश्री
गजानन माने सामाजिक कार्य - पद्मश्री
साहित्य शिक्षण- रमेश पतंगे - पद्मश्री
कुमी वाडिया - कला क्षेत्रातून पद्मश्री
रवीना टंडन - पद्मश्री.
पद्म पुरस्कारांची संपूर्ण यादी
हे वाचा - मिशन 2024 साठी भाजपचा मास्टरस्ट्रोक प्लान! '60-70' फॉर्म्युला तयार, ही आहे रणनीती
पद्म पुरस्कार कोणाला मिळतात?
गृह मंत्रालयाच्या मते, कोणतीही व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहे. मात्र, सरकारी कर्मचारी पदावर असेपर्यंत या पुरस्कारांसाठी पात्र नसतात. मात्र, डॉक्टर (Doctor) आणि शास्त्रज्ञांना (Scientist) यातून सूट देण्यात आली आहे.
पद्म पुरस्कारांसाठी निवड कशी केली जाते?
सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची सरकारं, केंद्र सरकारची मंत्रालयं किंवा विभाग, भारतरत्न आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पद्म पुरस्कारांसाठी कोणत्याही व्यक्तीच्या नावाची शिफारस करू शकतात. ही प्रक्रिया दरवर्षी होत असते.
दरवर्षी पंतप्रधान पद्म पुरस्कारांच्या नावांवर विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करतात. या समितीचे अध्यक्ष कॅबिनेट सचिव असतात. नामांकन आणि शिफारसी आलेल्या नावांचा विचार केल्यानंतर या समित्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना शिफारस करतात. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर पद्म पुरस्कारासाठी नावं निश्चित केली जातात.
एका वर्षात देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांची संख्या 120 पेक्षा जास्त नसावी, असा नियम आहे. पण यात मरणोत्तर पुरस्कार आणि परदेशी व्यक्तींना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचा समावेश असेल तर ही संख्या 120 च्या पुढे जाऊ शकते. महत्वाचं म्हणजे पद्म पुरस्कार सहसा मरणोत्तर दिले जात नाहीत. परंतु, काही प्रकरणांमध्ये, सरकार मरणोत्तर पुरस्कार देण्याचा विचार करू शकते.
पद्म पुरस्कार विजेत्यांना काय मिळते?
- दरवर्षी राष्ट्रपती भवनात या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं जातं. यादरम्यान, पद्म पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपतींची स्वाक्षरी आणि शिक्का असलेलं प्रमाणपत्र आणि पदक दिलं जातं.
- पुरस्कार विजेत्यांना त्यांच्या पदकाची एक प्रतिकृतीदेखील दिली जाते, जी ते कोणत्याही कार्यक्रमात वापरू शकतात.
- गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हा पुरस्कार कोणतीही पदवी नाही. त्यामुळे विजेत्यांच्या नावापुढे किंवा मागे ते वापरले जाऊ शकत नाहीत. कोणीही असं केल्यास पुरस्कार परत घेतला जाऊ शकतो.
- या पुरस्कारासह, विजेत्यांना कोणतंही रोख बक्षीस, भत्ता किंवा रेल्वे व विमान प्रवासात सवलत यांसारखी कोणतीही सुविधा दिली जात नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Padma award