Opinion Poll: बंगालमध्ये पुन्हा ममता सरकार, वाचा कोणत्या राज्यात कोणाला मिळणार सत्ता

Opinion Poll: बंगालमध्ये पुन्हा ममता सरकार, वाचा कोणत्या राज्यात कोणाला मिळणार सत्ता

ओपिनियन पोलनुसार(Assembly Election Opinion Poll) , भाजपनं पश्चिम बंगालमध्ये सत्ता पालटासाठी पूर्ण प्रयत्न केले असले, तरी ममता यांच्या टीएमसी सरकारलाच लोकांची पसंती मिळणार आहे. मात्र, भाजपला राज्यात अनेक जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 09 मार्च : पश्चिम बंगाल, तमिळनाडूसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांकडे देशाचं लक्ष लागलं आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ता पालट करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. अशात आता टाईम्स नाऊ आणि सी वोटर यांनी मिळून ओपिनियन पोल (Assembly Election Opinion Poll) प्रसिद्ध केला आहे. या ओपिनयन पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Election 2021) टीएमसी, तमिळनाडूमध्ये यूपीए, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये एनडीए तर केरळमध्ये एलडीएफचं सरकार येण्याचा अंदाज आहे, असं वृत्त नवभारत टाईम्सनं दिलं आहे. ओपिनियन पोलनुसार, भाजपनं पश्चिम बंगालमध्ये सत्ता पालटासाठी पूर्ण प्रयत्न केले असले, तरी ममता यांच्या टीएमसी सरकारलाच लोकांची पसंती मिळणार आहे. मात्र, भाजपला राज्यात अनेक जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. या पोलनुसार, राज्यात भाजपला पहिल्यांदाचा 100 जागांपेक्षा अधिक ठिकाणी विजय मिळणार असल्याचं चित्र आहे. तर, टीएमसीला 294 पैकी 154 जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज आहे.

तमिळनाडूतही भाजपच्या अपेक्षांना धक्का बसणार असल्याचं चित्र आहे. या राज्यातही यूपीए सरकार येणार असल्याचं चित्र आहे. पुद्दुचेरीत एनडीएचं सरकार स्थापन होणार असल्याचा अंदाज आहे. तर, केरळमध्ये मुख्यमंत्री विजयन यांच्या नेतृत्त्वात एलडीएफ पुन्हा एकदा वापसी करण्याची चिन्हं आहेत. आसाममध्ये एनडीएकडे जनतेचा कल असल्याचं चित्र आहे. पक्षाला राज्यात 126 जागांपैकी 67 जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज आहे.

पश्चिम बंगाल -

पश्चिम बंगालमध्ये यावेळी भाजपला चांगली उंची गाठता येणार असल्याचं चित्र आहे. मागील निवडणुकीत केवळ 3 जागा मिळणारा हा पक्ष यावेळी राज्यात 100 चा आकडा पार करेल, असा अंदाज आहे. तर, ममता बॅनर्जींच्या पक्षाला मागच्या वेळीच्या तुलनेत 57 जागांचा फटका बसणार असल्याचं समोर येत आहे. ममता यांना मागील निवडणुकीत 211 जागा मिळाल्या होत्या.

केरळ -

या सर्वेक्षणानुसार केरळमध्ये 140 जागांपैकी 82 जागा या लेफ्ट नेतृत्त्वाच्या एलडीएफडे जातील. तर, काँग्रेसप्रणित यूडीएफला 56 जागा मिळू शकतात. ओपिनियन पोलनुसार, मुख्यमंत्री पी. विजयन आताही लोकांची पहिली पसंत आहेत. भाजपला केरळमध्ये मोठा धक्का बसू शकतो. इथे पक्षाला केवळ 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे. पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसला डीएमकेसोबत युतीचा तितका फायदा होत असल्याचं दिसत नाही.

तमिळनाडू -

तमिळनाडूमध्ये अम्माची पार्टी एआयएडीएमके (AIADMK) सोबतच भाजपच्या अपेक्षांनाही धक्का बसणार आहे. राज्यात 234 जागांपैकी 154 जागा यूपीए (DMK-Congress) यांना मिळण्याचा अंदाज आहे. एआयएडीएमके - भाजप युतीला 65 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इथे एमएनएमला 5, एएमएमके 3 आणि अन्य पक्षांना 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

आसाम -

आसाममध्ये भाजपसाठी चांगली बातमी आहे. ओपिनियन पोलनुसार राज्यात पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होणार आहे. इथे युतीला 126 मधील 67 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, यूपीएच्या खात्यात मागील वर्षीच्या 39 जागांच्या तुलनेत यावेळी 57 जागा जमा होणार आहेत. अन्य पक्षांच्या खात्यात 2 जागा जमा होण्याचा अंदाज आहे.

पुद्दुचेरी -

ओपिनियन पोलनुसार, पुद्दुचेरीमधील 30 विधानसभा जागांपैकी एनडीएला 16 वरुन 20 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, यूपीएच्या खात्यात 13 जागा जमा होण्याचा अंदाज आहे. पुद्दुचेरीमध्ये 6 एप्रिलला मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान होणार असून 27 मार्च ते 29 एप्रिलदरम्यान हे मतदान पार पडणार आहे. तमिळनाडू आणि केरळमध्येही एकाच टप्प्यात निवडणुका पार पडतील. या सर्व राज्यांमध्ये 2 मे रोजी मतमोजणी नंतर निकाल जाहीर केला जाईल.

Published by: Kiran Pharate
First published: March 9, 2021, 7:55 AM IST

ताज्या बातम्या