नवी दिल्ली, 6 मे : 10 एप्रिलपासून देशातील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना बूस्टर डोस लागू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी कोरोना लसीचा दुसरा डोस आणि तिसरा बुस्टर डोस यामध्ये 9 महिन्यांचे अंतर असावे, असा नियम बनविण्यात आला आहे. यावर आता कोरोना लसीकरणाशी (Covid-19 Vaccination) संबंधित असलेल्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने (NTAGI) परदेशात प्रवास करणाऱ्या नागरिकांना 9 महिन्यांपूर्वीच बूस्टर डोस (Booster Dose) देण्यात यावा, असे सुचविले आहे. गुरुवारी सूत्रांनी याबाबतची माहिती दिली. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी या विषयावर NTAGI ची बैठक झाली. यावेळी ही सूचना करण्यात आली.
तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे?
या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले की, प्रत्येक नागरिकासाठी बुस्टर डोसच्या संबंधित अंतराच्या कालावधीत कोणताही बदल झालेला नाही. तथापि, या मुद्द्यावर आरोग्य तज्ज्ञांचे संमिश्र मत आहे की, बूस्टर डोसशी संबंधित वेळ मध्यांतर कमी करणे आवश्यक आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशातील फार कमी लोकांनी कोरोना लसीच्या तिसऱ्या डोसची इच्छा व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे सरकारने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना बूस्टर डोस लागू करण्याची परवानगी दिली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन कोविड-19 नॅशनल टास्क फोर्सचे उपाध्यक्ष डॉ. राजीव जयादेवन यांच्या मते, कोविड संसर्गाविरूद्ध प्राथमिक लसीकरण आणि तिसरा डोस यामध्ये जास्त अंतर नसावे. कारण लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोस यांच्यातील अंतर जास्त असेल, कोरोनासोबत लढण्याची तीव्रता कमी होईल.
बंगळुरू येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ जेनेटिक्स अँड सोसायटी या संस्थचे संचालक डॉ. राकेश मिश्रा यांनी म्हटले आहे की, लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोसमधील अंतर 9 महिन्यांवरून 5-6 महिन्यांपर्यंत कमी केले पाहिजे. कारण बुस्टर डोस हा 9 महिन्यांच्या आधी मिळायला हवा. दरम्यान, 10 एप्रिलपासून देशातील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना बूस्टर डोस लागू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी कोरोना लसीचा दुसरा डोस आणि तिसरा डोस यामध्ये 9 महिन्यांचे अंतर असावे, असा नियम बनविण्यात आला आहे.
हे वाचा - IMP News! भारतात लवकरच लागू होणार 4 दिवसांचा आठवडा? कसं असेल स्वरूप? तज्ज्ञ म्हणतात...
कोविशिल्ड लशीची किंमत आधी 600 रुपये तर कोव्हॅक्सिनची किंमत 1200 रुपये प्रति डोस इतकी होती. या लसी आता 225 रुपयांना देण्यात येत आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी डोस तयार करण्याचा खर्च सरकार उचलणार नाही. त्यासाठी खासगी केंद्रांवर लसीच्या किमतीनुसार पैसे द्यावे लागतील. सरकारने खासगी केंद्रांवर कोव्हिशिल्डची किंमत 225 रुपये तर कोवॅक्सिनची किंमत 225 रुपये आणि स्पुतनिक व्हीची किंमत 1,145 रुपये निश्चित केली आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीचे प्रमुख आदर पुनावाला आणि भारत बायोटेकच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, सुचित्रा इल्ला यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली होती. ही रक्कम Co-WIN अॅपच्या माध्यमातून आकारली जाणार आहे. Co-WIN प्रणाली सर्व नागरिकांना एसएमएस अलर्ट पाठवेल जे त्यांच्या डिजिटल रेकॉर्डमधील पहिल्या लसीकरण तपशीलांवर आधारित त्यांच्या तिसऱ्या शॉटसाठी पात्र असतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.