पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षांत देशाच्या संरक्षण सिद्धतेवर भर दिला आहे. संरक्षण क्षेत्रात देश आत्मनिर्भर व्हावा यासाठी देशातच संरक्षण साहित्य सामुग्री, उपकरणं तयार व्हावीत यासाठी ‘मेड इन इंडिया’ (Made In India) धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. सध्या अफगाणिस्तानात उद्भवलेल्या यादवीमुळे भारताला दहशतवादाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, कुरापतखोर चीनचा उपद्रवही वाढत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर लष्कर, नौदल आणि हवाई दलाची संरक्षण सिद्धता वाढवण्यात येत असून, नुकतंच भारतानं एक पाऊल पुढं टाकलं आहे. सागरी सुरक्षेत भारताचं सामर्थ्य वाढवणारं ‘ध्रुव’ (Dhruv) क्षेपणास्त्रांचा मागोवा घेणारी युद्धनौका (Missile Tracking Ship) 10 सप्टेंबर 2021 रोजी नौदलात (Navy) दाखल होत आहे. ‘इलेक्ट्रॉनिक स्कॅन अॅरे रडार’ (एईएसए-ASA)’ हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणारा भारत जगातील पाचवा देश आहे. टीव्ही9 हिंदी डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. विशाखापट्टणममध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्या हस्ते अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मागोवा घेणारी ही युद्धनौका दाखल करण्यात येणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओ (DRDO), ‘राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था’ (NTRO) आणि भारतीय नौदलानं ‘ध्रुव’ ही युद्धनौका निर्माण केली आहे. हे वाचा - चांगली बातमी! सणासुदीपूर्वी 6 कोटी लोकांच्या खात्यात पैसे जमा करणार सरकार एकापेक्षा अधिक रडार आणि अँटेनासह सुसज्ज अशा या युद्धनौकेवर असलेली यंत्रणा शत्रूचे उपग्रह, क्षेपणास्त्र क्षमता आणि लक्ष्यापासून त्याचे अंतर यासारख्या गोष्टींचा अचूक वेध घेते. अण्वस्र, बॅलेस्टिक क्षेपणास्रं आणि उपग्रहांचा मागोवा या जहाजावरील यंत्रणा घेऊ शकते. दोन हजार किलोमीटरपर्यंतच्या अंतरापर्यंत सर्व बाजूंनी टेहाळणी ही यंत्रणा करू शकते. लांब पल्ल्यावरील लक्ष्याच्या टेहळणीसाठी त्यात एस-बँड रडार (S-Band-Radar) बसवण्यात आले आहेत. या जहाजावरून चेतकसारखी हेलिकॉप्टर्स उड्डाण करू शकतात. भारताने अत्यंत गुप्तपणे हा प्रकल्प राबवला. VC-11184 या सांकेतिक नावाने विशाखापट्टणममधील डॉकयार्डमध्ये जून 2014च्या मध्यापासून या जहाजाच्या निर्मितीचे काम सुरू झाले. 2018मध्ये हे जहाज तयार झालं. 2019 पासून त्याच्या समुद्रात चाचण्या सुरू झाल्या. आता10 सप्टेंबर 2021 रोजी हे जहाज नौदलात दाखल करण्यात येत आहे. हे यश भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं असून, आता भारत अशा अनेक जहाजांची निर्मिती करण्यासाठी सक्षम झाला आहे. यामुळे सागरी सुरक्षा क्षेत्रात भारताचे सामर्थ्य वाढल्यानं पाकिस्तान आणि चीनवर चांगलीच जरब निर्माण होणार आहे. भारताच्या दृष्टीनं ही अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.