Home /News /national /

भारतात येणार कोरोनाची चौथी लाट? 'अचूक' अंदाज लावणारे IIT कानपूरचे प्राध्यापक म्हणतात..

भारतात येणार कोरोनाची चौथी लाट? 'अचूक' अंदाज लावणारे IIT कानपूरचे प्राध्यापक म्हणतात..

Corona Fourth Wave India: आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मणींद्र अग्रवाल, ज्यांनी गेल्या दोन वर्षांत अनेक वेळा कोरोनाबद्दल अचूक भविष्यवाणी केली आहे, त्यांनी एका नव्या अभ्यासानंतर दावा केला आहे की, भारताला चौथी लाट पाहावी लागणार नाही.

    नवी दिल्ली, 10 मे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर बहुतांश सर्व व्यवहार आता सुरळीत झाले आहेत. मास्कबंदीही काही राज्यांमध्ये हटवली गेली आहे. त्यामुळे आता कोरोना (corona pandemic) संपल्यात जमा असल्याचं अनेकांना वाटत असतानाच चौथी लाट येईल की काय अशी भीतीही जनमानसात आहे; मात्र भारतात चौथी लाट येण्याची फारशी शक्यता नाही, असं मत आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक मणींद्र अग्रवाल यांनी मांडलं आहे. अग्रवाल यांनी कोरोनाबाबत गेल्या दोन वर्षांमध्ये वर्तवलेले अनेक अभ्यासपूर्ण अंदाज योग्य ठरले होते. आताही नव्या अभ्यासानुसार त्यांनी हा दावा केला आहे. अग्रवाल हे कानपूर आयआयटीत (IIT Kanpur) कम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग विभागात प्राध्यापक आहेत. कोरोनाची पुढची वाटचाल जाणून घेण्यासाठी त्यांनी 'सूत्र' (SUTRA) नावाचं एक गणितीय मॉडेल तयार केलं आहे. त्यातल्या आकडेवारीनुसार त्यांनी गेल्या दोन वर्षांत अनेकदा कोरोनाबाबत अंदाज वर्तवले आहेत. तसंच त्यांनी वर्तवलेले अंदाज खरेही ठरले आहेत. भारतात तिसरी लाट ओसरल्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा रुग्णवाढ होऊ लागली होती. गेल्या आठवड्यात दिवसाला 3 हजारांपेक्षा जास्त रुग्णसंख्या होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांतील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन कोरोना प्रतिबंधक उपायांमध्ये शिथिलता येऊ देऊ नये, असं सांगितलं होतं. त्यामुळे चौथ्या लाटेची भीती लोकांच्या मनात निर्माण होऊ लागली होती. त्यावर आता काळजी करण्याचं कारण नसल्याचं नव्या दाव्यानुसार समोर येतं आहे. भारतात चौथी लाट न येण्याची शक्यता जास्त असल्याचं कानपूर आयआयटीमधले प्राध्यापक मणींद्र अग्रवाल यांनी म्हटलं आहे. कोरोनाला प्रतिबंध करणारी भारतीयांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती (Natural Immunity), तसंच कोरोनाच्या व्हॅरिएंट्समध्ये फारसा काही बदल न झाल्यामुळे चौथ्या लाटेची (Fourth Wave) शक्यता नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. Monkeypox Virus: कोरोनानंतर जगावर 'मंकीपॉक्स'चा धोका! जाणून घ्या संसर्गजन्य आजाराची लक्षणे आणि उपचार गेल्या दोन वर्षांत अनेक नागरिकांना कोरोनाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतातल्या जवळपास 90 टक्के नागरिकांच्या शरीरात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी नैसर्गिक प्रतिकारशक्ती तयार झाली. भारतात लसीकरणाचं प्रमाणही भरपूर आहे. आयसीएमआरच्या सर्व्हेनुसार, सरकारी नोंदींच्या तुलनेत प्रत्यक्षात संसर्गबाधित होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या अधिक असते, असंही अग्रवाल यांचं म्हणणं आहे. ही संख्या 30 पट अधिक असते. ज्यांच्यामध्ये कोरोनाविरुद्धची प्रतिकारशक्ती तयार झाली आहे, त्यांच्यावर कोरोनाचे गंभीर परिणाम दिसून येत नसल्याचं ओमायक्रॉनबाबत 36 देशांमध्ये झालेल्या अभ्यासावरून दिसून येतं. कोरोनाच्या सध्याच्या व्हॅरिएंट्समध्ये फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे चौथी लाट न येण्यासाठी हेही एक कारण असू शकतं, असं अग्रवाल यांना वाटतं. आतापर्यंत BA.2, BA.2.9, BA.2.10 आणि BA.2.12 हे व्हॅरिएंट्स आले आहेत व ते ओमायक्रॉनशी (Omicron) निगडित आहेत. कोरोनाच्या सगळ्यात जास्त केसेस सापडूनही दिल्ली एनसीआरमध्येही नवीन म्युटेशन झालेलं नाही. म्हणजेच अनेक नागरिकांना आधीच ओमायक्रॉनचा संसर्ग होऊन त्यांच्यात प्रतिकारशक्ती तयार झाली आहे, असं अग्रवाल यांचं म्हणणं आहे. त्यामुळे जेव्हा कोरोना व्हायरसचं नवं रूप समोर येईल, तेव्हाच चौथी लाट येण्याची शक्यता निर्माण होईल. अलीकडे कोरोना केसेसमध्ये झालेली वाढ ही नव्या व्हॅरिएंटमुळे नसून नियमातल्या शिथिलतेमुळे झाली आहे, असंही ते सांगतात. चीनमध्ये मध्यंतरी कोरोना संसर्ग वाढला होता. त्याबद्दल ते सांगतात, की चीन, दक्षिण कोरिया, हाँगकाँगसारख्या देशांचं कोरोनाबाबत झीरो टॉलरन्स धोरण आहे. म्हणजेच थोडाही संसर्ग पसरला तरी ते लॉकडाउनसारखे कडक नियम लावतात. त्यामुळे तिथल्या नागरिकांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती विकसित होऊ शकत नाही. भारतातली परिस्थिती यापेक्षा फार वेगळी असल्यानं सध्या तरी आपल्यकडे चौथी लाट येण्याची शक्यता नसल्याचं प्राध्यापकांचं म्हणणं आहे. त्यामुळे कोरोनाच्या भीतीपासून तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे.
    First published:

    Tags: Corona, Corona spread

    पुढील बातम्या