अद्वैत मेहता, पुणे, 11 फेब्रुवारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत मोठा मोर्चा काढत CAA आणि NRCचा विरोध करणाऱ्यांना इशारा दिला. तसंच मनसेच्या नेत्यांकडून आता राज ठाकरे यांना हिंदुत्त्ववादी नेता म्हणून प्रोजेक्ट करण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्या या बदललेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘लोक काहींना ऐकायला येतात…बघायला येतात, पण त्यांना गांभीर्याने घ्यायची गरज नाही,’ असा टोला लगावत शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे हे महाआघाडीच्या बाजूने झुकल्याची चर्चा होती. तेव्हा शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात बैठकाही झाल्या होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने मनसेच्या राजकारणानेही वेगळं वळण घेतलं आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांचा पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत सामना होण्याची शक्यता आहे. ‘भाजप ही आपत्ती आहे, असं लोकांना वाटतंय’ दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीने दणदणीत विजय मिळवल्यानंतर (Delhi Election Result 2020) शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘दिल्लीचा निकाल अपेक्षित होता. लोकांनी विकासाला मत देत धार्मिक प्रचाराला ठोकरलं आहे. या निकालातून लोकांनी अहंकाराला चपराक दिली. भाजप ही आपत्ती आहे असं लोकांना वाटत आहे,’ असा घणाघात शरद पवार यांनीकेला आहे. केजरीवाल यांच्या फक्त या एका रणनीतीमुळे दिल्लीत बलाढ्य भाजपवर केली मात ‘भाजपची पराभवाची ही मालिका थांबेल असं वाटत नाही. आता आम्हा लोकांची जबाबदारी आहे की लोकांना किमान समान कार्यक्रम द्यावा, तर लोक भाजपला डावलतील. भाजपमध्येही मोदी-शहा यांच्याबद्दल दहशत आहे. त्यांचे लोक इकडे तिकडे बघतात आणि मग बोलतात,’ असं सांगत शरद पवार यांनी भाजपवर चौफेर टीका केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







