मुंबई, 16 मे : वाराणसी मधील ज्ञानवापी मशिदीमध्ये (Gyanvapi Mosque) कोर्टाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या सर्वेक्षणाला आता वेगळं वळण लागलं आहे. या मशिदीच्या विहिरीत शिवलिंग (Shivling) सापडल्याचा दावा हिंदू पक्षानं केला आहे. या दाव्यानंतर कोर्टानं ज्या जागेवर शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे, त्या जागेला तातडीनं सील करण्याचा आदेश दिला आहे. त्या जागेवर कोणत्याही व्यक्तीला जाऊ देऊ नये, असा आदेश कोर्टाने दिला असून त्याच्या सुरक्षेची जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि सीआरपीएफला दिली आहे. वारणासीतल्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम सोमवारी संपले. या सर्वेक्षणाचा शेवट वादळी झाला. तिसऱ्या दिवसाचं सर्वेक्षण समाप्त होताच मशिदीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षानं केला आहे. हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन (Vishnu Jain) यांनी पाहणीदरम्यान विहिरीच्या (Well) आत शिवलिंग सापडल्याचा दावा केला. शिवलिंगाच्या संरक्षणासाठी आता पुन्हा सिव्हिल कोर्टामध्ये (Civil Court) अर्ज केला जाणार आहे. हिंदू पक्षातले सोहनलाल यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मशिदीत बाबा सापडले आहेत. तेच बाबा ज्याची नंदी वाट पाहत होता. मशिदीमध्ये शिवलिंग मिळाल्यानंतर हर हर महादेव अशा घोषणा देण्यात आल्या तसंच सर्वांनी आनंद साजरा केला. आता पश्चिमेकडच्या दरवाजाजवळ असलेल्या अवशेषांची तपासणी करण्याचीही आम्ही मागणी करणार आहोत,’ असं सोहनलाल म्हणाले. हिंदू पक्षाच्या दाव्यानुसार 12 फूट 8 इंच व्यासाचं शिवलिंग सापडलं आहे. या शिवलिंगाचं तोंड नंदीकडे असून, वजूस्थळातलं सर्व पाणी काढून केलेल्या पाहणीवेळी ते आढळल्याचा त्यांचा दावा आहे.
#WATCH "Shivling....Jiski Nandi pratiksha kar rahi thi... The moment things became clear the chants of 'Har Har Mahavdev' resonated in mosque premises," claims Sohan Lal Arya, petitioner in Gyanvapi mosque case, who accompanied the Court commission on mosque survey in Varanasi pic.twitter.com/iWwubz4wPa
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 16, 2022
मुस्लीम पक्षानं मात्र हा दावा फेटाळला आहे. ज्ञानवापी मशिद समितीनं या सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या सर्वेक्षणाला थांबवण्याची मागणी त्यांनी या याचिकेत केली आहे. सर्वोच्च न्यायालयात या विषयावर मंगळवारी सुनावणी होऊ शकते. सर्वेक्षणाचा रिपोर्ट सार्वजनिक होणार की नाही याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालय मंगळवारच्या सुनावणीमध्ये देण्याची शक्यता आहे. सिव्हिल जजच्या (सीनिअर डिव्हिजन) आदेशानुसार, फिर्यादी आणि प्रतिवादी बाजू, तसंच कोर्टानं नियुक्त केलेल्या प्रतिनिधींचं पथक सर्वेक्षणासाठी ज्ञानवापी मशिदीत पोहोचलं होतं. रविवारीही ज्ञानवापी मशिदीचं सर्वेक्षण करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी 12 वाजता सर्वेक्षणाचं काम पूर्ण होणार होतं; मात्र नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ लागला. दुसऱ्या दिवशी ज्ञानवापी मशिदीचा घुमट आणि भिंतींचं सर्वेक्षण करण्यात आलं.तळघराव्यतिरिक्त बाजूची भिंत, नमाज स्थळ, वजू स्थळ या ठिकाणीही सर्वेक्षण करण्यात आलं. 31 वर्षे जुने प्रकरण, 353 वर्षांचा इतिहास.. ज्ञानवापी मशीदीवर हक्क कोणाचा? हिंदू की मुस्लीम? दरम्यान, सर्वेक्षण टीममधील सदस्य आरपी सिंह यांना सोमवारी सर्वेक्षणात सहभागी होऊ दिलेलं नाही. आरपी सिंह यांच्यावर आतील माहिती लीक केल्याचा आरोप आहे.