कोरोना रुग्णाचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार, मुस्लीम तरुणांनी केले अंत्यसंस्कार

कोरोना रुग्णाचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार, मुस्लीम तरुणांनी केले अंत्यसंस्कार

कोरोनानं मरण पावलेल्या हिंदू व्यक्तीचे अंत्यसंस्कार (Muslim Brothers Perform Last Rites of Hindu Man) करून दोघा मुस्लीम भावांनी माणुसकीचं दर्शन घडवून समाजापुढं आदर्श निर्माण केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 21 एप्रिल : देशभरात सध्या (Corona Cases in India) कोविड-19 आजाराच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णालयात जागा मिळणंदेखील कठीण झालं असून मृतांचा आकडाही वेगानं वाढत आहे. ऑक्सिजन, अत्यावश्यक औषधं यांचा तुटवडा भासत आहे. आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू केले जात आहेत. वाढत्या संसर्गामुळे सर्वसामान्य जनता भयग्रस्त झाली असून पुढं काय होणार या चिंतेनं हवालदिल झाली आहे. अशावेळी या आजारानं मरण पावणाऱ्या व्यक्तीची मृत्यूनंतर होणारी परवड तर सांगण्यापलीकडे आहे. संसर्गाच्या भीतीनं मृतदेहाला हात लावायलादेखील कोणीही धजावत नाही. जवळचे नातेवाईक उपस्थित राहू शकत नाहीत किंवा अनेकजण स्पष्ट नकारदेखील देत आहेत.

रक्ताची नातीदेखील नावापुरतीच असल्याचा अनुभव येत आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत असलेल्या मृतदेहांच्या रांगा पहायला मिळायला आहेत. अशी भीषण परिस्थिती सध्या अनेक ठिकाणी ओढवली आहे. मात्र या परिस्थितीतही माणुसकी टिकून असल्याचा दिलासा तेलंगणामधील दोन मुस्लीम तरुणांच्या वागण्यातून मिळाला आहे. कोरोनानं मरण पावलेल्या हिंदू व्यक्तीचे अंत्यसंस्कार (Muslim Brothers Perform Last Rites of Hindu Man) करून या दोघा भावांनी माणुसकीचं दर्शन घडवून समाजापुढं आदर्श निर्माण केला आहे.

तेलंगणामधील पेड्डा कोडापगल मंडळातील काटेपल्ली गावातील ही घटना असून मोघुलैया नावाच्या व्यक्तीला कोविड-19 झाल्यानं भानसुवाडा इथल्या रुग्णालयात उपचार सुरू होते. पण दुर्दैवानं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संसर्गाच्या भीतीनं त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास किंवा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास त्यांच्या कुटुंबीयांनी नकार दिला.

अशावेळी मोघुलैया यांच्याशी कोणतंही रक्ताचं नातं नसणारे शफी आणि अली हे अॅम्ब्युलन्स चालवणारे दोन मुसलमान भाऊ पुढं आले. त्यांनी आपल्या अॅम्ब्युलन्समधून भानसूवाडा इथल्या हिंदू स्मशानभूमीत हिंदू धर्माच्या रीतीरिवाजानुसार मोघुलैया यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार केले. जात,धर्म बाजूला ठेवून अशा कठीण परिस्थितीत धोका पत्करून माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या शफी आणि अली यांच्या या कृत्याचं सर्वत्र कौतुक होत असून सामाजिक सलोखा वाढवणाऱ्या त्यांच्या या कार्याबद्दल आनंद, समाधान व्यक्त केलं जात आहे.

सध्याच्या या निराशाजनक परिस्थितीत आशेचा किरण अशा घटनांमुळे दिसत आहे. या महाभयानक संकटामुळे उद्भवलेल्या अनेक आव्हानांना तोंड देताना थकून गेलेल्या समाजाचं मनोधैर्य अशा माणुसकी जपणाऱ्या लोकांमुळे जपलं जात आहे. सध्याच्या काळात अशा कोरोना योद्ध्यांची अधिक गरज असून परिस्थिती नियंत्रणात राहाण्यासाठी सर्वांनीच काळजी घेणं आवश्यक आहे.

Published by: Kiran Pharate
First published: April 21, 2021, 4:01 PM IST

ताज्या बातम्या