Home /News /national /

मुंडका दुर्घटना! माझी गर्लफ्रेंड बिल्डिंगमध्ये अडकली होती; Video कॉलवर तिला धीर देत होतो, पण...

मुंडका दुर्घटना! माझी गर्लफ्रेंड बिल्डिंगमध्ये अडकली होती; Video कॉलवर तिला धीर देत होतो, पण...

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी फॅक्टरीचा मालक हरीश गोयल आणि वरुण गोयल यांना अटक केली आहे. या कर्मिशिअल बिल्डिंगचा मालक मनीष लाकाडा याचा पोलीस शोध घेत आहेत.

    नवी दिल्ली, 14 मे : शुक्रवारी (13 मे) दिल्लीतल्या (Delhi) मुंडका भागातल्या चार मजली इमारतीला भीषण आग लागली. त्या दुर्घटनेत 29 ते 30 जणांचा मृत्यू (Death) झाला असावा, अशी शक्यता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून, मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं आहे. या अग्निकांडाच्या अनुषंगाने धक्कादायक माहिती आता समोर येऊ लागली आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी एक तास उशिरा पोहोचले असा आरोप नागरिकांनी केला आहे. तसंच, वेळेत मदत न मिळाल्याने एका व्यक्तीच्या मैत्रिणीचा या घटनेत मृत्यू झाला आहे. `एशियानेट न्यूज`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे. ही घटना घडली तेव्हा घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका युवकानं घटनेचं भीषण वास्तव मांडलं. तो म्हणाला, `माझी मैत्रीण आगीने वेढलेली होती. मी व्हिडिओ कॉलवरून तिला धीर देत होतो. काही वेळानं फोन कट झाला. मी तिला वाचवू शकलो नाही,` असा आक्रोश या युवकानं केला. त्याचा आक्रोश असह्य होता. दिल्लीतल्या मुंडका (Mundka) भागात झालेल्या या घटनेनं दिल्ली मॉडेलवर (Delhi Model) प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या प्रकरणाची मॅजिस्ट्रियल चौकशी (Magisterial Inquiry) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या इमारतीला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर सुमारे एका तासानं अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. ही दुर्घटना आणि त्यानंतर अनेक प्रकारे झालेला निष्काळजीपणा यावरून नागरिकांनी सोशल मीडियावर (Social Media) संताप व्यक्त केला आहे. अन्वेष्का दास (@AnveshkalD) यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, `वेदनादायी. असं केवळ गरीबांसोबतच का घडतं? एक तासानंतर अग्निशमन दलाचे बंब पोहोचले. काही दिवसांनी राजकारणी सर्व काही विसरून जातील. दिल्ली विकासाचं मॉडेल हेच आहे का? याला जबाबदार कोण?` `एसीचा स्फोट झाल्यानं ही आग लागली असावी. अग्निशमन दलाच्या जवानांना (Firefighters) एका शोध मोहिमेदरम्यान इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे अवशेष मिळाले. हे अवशेष एका व्यक्तीचे होते की अनेक व्यक्तींचे, हे सांगणं कठीण आहे. आम्ही अग्निशामक दलाचे एकूण 30 बंब घटनास्थळी पाठवले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी, तसंच मदतकार्यासाठी आम्ही 125 जणांना कामाला लावलं. रात्री आम्हाला 27 मृतदेह सापडले. काही मृतदेहांचे भाग सकाळी मिळाले. यावरून त्या ठिकाणी अजून दोन ते तीन मृतदेह असावेत, असा अंदाज आहे. एकूण मृतांची संख्या 29 ते 30 असू शकते,` अशी माहिती दिल्ली फायर सर्व्हिसेसचे संचालक अतुल गर्ग यांनी दिली. जखमी झालेल्या 12 व्यक्तींपैकी एक व्यक्तीची ओळख पटलेली नाही, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. या घटनेत किरकोळ जखमी झालेल्या नागरिकांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मृतदेह संजय गांधी रुग्णालयात नेण्यात आले आहेत. नातेवाईकांचे डीएनए नमुने (DNA Samples) घेतल्यानंतर या मृतदेहांची ओळख पटवणं शक्य होणार आहे, असं एमसीडीचे धर्मेंद कुमार यांनी सांगितलं. दरम्यान, या दुर्घटनेविषयी देशातल्या अनेक राजकीय नेत्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. याबाबत कॉंग्रेसचे नेत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट केलं. 'दिल्लीतल्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळ लागलेल्या आगीत नागरिकांच्या वेदनादायी मृत्यूंमुळे दुःख झालं. शोकाकुल कुटुंबियांप्रति संवेदना आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना,' असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. बसपाच्या प्रमुख मायावती (Mayawati) यांनीदेखील ट्विट केलं. 'ही घटना अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. पीडितांच्या कुटुंबियांप्रति माझ्या मनापासून संवेदना. सरकारने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी,' असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'दिल्लीतल्या मुंडका अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली. शोकग्रस्त कुटुंबीयांप्रति मनःपूर्वक संवेदना. सरकारने त्यांना नुकसानभरपाई द्यावी, असं आवाहन करतो. इमारतीच्या बांधकामावेळी सुरक्षा मानकं, अग्निशमन नियम आणि व्यवस्थेकडं दुर्लक्ष केल्यानं असे अपघात घडतात. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे,' असं ट्विट सपाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी केलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांनी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासमवेत घटनास्थळी पाहणी केली. या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये, तर जखमी झालेल्यांना 5000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा दिल्ली सरकारने केली. तसंच या घटनेची मॅजिस्ट्रियल अर्थात दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी फॅक्टरीचा मालक हरीश गोयल आणि वरुण गोयल यांना अटक केली आहे. या कर्मिशिअल बिल्डिंगचा मालक मनीष लाकाडा याचा पोलीस शोध घेत आहेत.
    First published:

    Tags: Delhi, Fire, Rahul gandhi, Social media

    पुढील बातम्या