'महाराष्ट्रात कुणाचीही हुकूमशाही चालणार नाही', अजित पवारांचा राज ठाकरेंना मोठा इशारा
'महाराष्ट्रात कुणाचीही हुकूमशाही चालणार नाही', अजित पवारांचा राज ठाकरेंना मोठा इशारा
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरेंवर औरंगाबादच्या सभेवरुन कारवाई करण्याबाबतचं विधान केलं आहे. त्यानंतर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) महाराष्ट्रात कुणाचीही हुकूमशाही चालणार नाही, अशा शब्दांत सुनावलं आहे.
नाशिक, 2 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी औरंगाबादच्या (Aurangabad) सभेत मशिदींवरील भोंग्याबाबत (Mosque loudspeaker) मांडलेल्या भूमिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंना उद्देशून महत्त्वाचा इशारा दिला. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. कुणाचीही हुकूमशाही (dictatorship) चालणार नाही. कायद्याच्या विरोधात कुणी काही करेल तर पोलीस कारवाई करणार, असा इशारा अजित पवार यांनी दिला. विशेष म्हणजे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनीदेखील राज ठाकरेंवर औरंगाबादच्या सभेवरुन कारवाई करण्याबाबतचं विधान केलं आहे. त्यानंतर आता अजित पवार यांनी राज ठाकरेंना महाराष्ट्रात कुणाचीही हुकूमशाही चालणार नाही, अशा शब्दांत सुनावलं आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
"राज ठाकरेंनी मागच्या सभेतील भाषणच रिपीट केलं. शरद पवारांनी कधीही जातीच राजकारण केलं नाही. कारण नसतांना शरद पवारांचं नाव घ्यायचं, त्यांचं नाव घेतलं म्हणजे प्रसिद्धी मिळते. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. कुणाचीही हुकूमशाही चालणार नाही. कायद्याने, संविधानाने सांगितलेल्या नियमांचं पालन सर्वांना करावं लागेल", असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
"उत्तर प्रदेशात फक्त मशिदींवरील भोंगे उतरवले नाही, तर माझ्या माहितीप्रमाणे मंदिरांचेही लाऊड स्पिकर बंद झाले. राज ठाकरेंच्या सभेत अटी-शर्तींचे पालन केले गेले नसेल तर पोलिसांनी पुढील कारवाई करावी. लोकसभेच्या वेळी ते भाजप विरोधात बोलत होते. त्यानंतर आता त्यांचं मनपरिवर्तन झालं. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना विरोधात बोलायला सुरुवात केलीय", असं अजित पवार म्हणाले.
('भुंकणाऱ्या कुत्र्यांची तोंड बंद करा', अबू आझमींची राज ठाकरेंवर टोकाची टीका)
"घरात बसून यांना बोलायला काय जातं? केसेस कार्यकर्त्यांवर दाखल होतील. कायद्याच्या विरोधात कुणी काही करेल तर पोलीस कारवाई करणार. कुणाच्या भाषणातून जातीय द्वेष पसरवला जात असेल तर हे महाराष्ट्राला परवडणारं नाही. कुणी अल्टिमेटम देत असेल आणि त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर पोलीस यंत्रणा त्यांचं काम करेल", असा इशारा अजित पवारांनी दिला.
राज्याचं गृहविभाग राज ठाकरेंवर कारवाई करणार?
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर गृह विभाग अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेनंतर संवेदनशील भागांसाठी विशेष सूचना गृह मंत्रालयाकडून करण्यात येणार असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांच्या भाषणाबाबत कायदेशीर मत जाणून कारवाई करणार असल्याचंही ते म्हणालेत.
औरंगाबादचे पोलिस आयुक्त राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास करत आहेत. पोलीस राज ठाकरे यांच्या सभेची टेप ऐकणार आहेत. राज ठाकरे यांच्या सभेत किती नियम पाळले आणि किती टाळले याचा आढावा पोलीस घेणार आहेत. त्यानंतर कायदेशीर मत घेऊन काय कारवाई करायची हे ठरवले जाईल. कुठल्याही घटना घडू नये यासाठी आम्ही तयारीत आहोत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची उद्या मुंबईला बैठक बोलावली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचं उल्लंघन कोणीही करून चालणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल सक्षम असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.