कोलकाता, 11 जून: पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचं मोठं स्वप्न उधळून लावल्यानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजपला एका मागोमाग एक धक्के देत आहेत. या वेळी थेट पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांना तृणमूल काँग्रेसच्या वाटेवर त्यांनी आणलं आहे. मुकुल रॉय कोलकात्यात TMC च्या कार्यालयात पोहोचल्याबरोबरच बातम्यांना उधाण आलं. मुकुल रॉय आणि त्यांचा शुभ्रांशु रॉय दोघांनीही TMC मध्ये प्रवेश केला.
आधीच भाजपचे 33 आमदार पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सुरुवातीला फक्त शुभ्रांशु रॉय पक्ष सोडणार असं सांगितलं जात होते. पण आता मुकुल रॉयसुद्धा पक्ष सोडणार आहेत.
‘ममता बॅनर्जी’ होणार कम्युनिस्ट परिवाराची सून, ‘समाजवाद’ शी करणार लग्नमुकुल रॉय हे भाजपच्या पहिल्या फळीतले नेते असं मानलं जात होतं. त्यांनी चार वर्षांपूर्वीच वाजत-गाजत पक्षप्रवेश केला आणि तेव्हापासूनच बंगाल काबीज करायचं स्वप्न भाजपने सत्यात उतरवायचं ठरवलं होतं. या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ममता बॅनर्जींच्या TMC ला जोरदार शह दिला. पण अखेर दीदींची सरशी झाली. या बंगाल विजयानंतर पुन्हा मुख्यमंत्री झालेल्या ममता बॅनर्जींनी भाजपची सर्व बाजूंनी कोंडी सुरू केली. त्यातून केंद्र सरकार विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य सरकार असा संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.