मुंबई, 23 ऑगस्ट: देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान असणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला कायमच धोका असतो, त्यामुळं या पदावरील व्यक्तीच्या सुरक्षेसाठी खास व्यवस्था तैनात केलेली असते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) हे केवळ देशातीलच नाही, तर संपूर्ण जगातील प्रभावी नेत्यांपैकी एक आहेत. धाडसी निर्णय घेण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. परंतु त्यामुळं त्यांच्या सुरक्षेची मोठी काळजी घेतली जाते. अत्याधुनिक अशा गाड्यांपासून ते विशेष प्रशिक्षण घेतलेले आणि घातक शस्त्रांस्त्रांनी सज्ज असे बॉडीगार्ड पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी कायम तैनात असतात. परंतु आता पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी नवा प्लॅन बनवला गेलाय. येथून पुढं पंतप्रधानांच्या नियमित सुरक्षा व्यवस्थेत आणखी एका गोष्टीची भर पडणार आहे. ते म्हणजे मुधोळ हाऊंड श्वान. मुधोळ हाऊंड श्वान इथून पुढे पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेचा भाग असणार आहेत. विशेष छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेमध्येही या मुधोळ हाऊंडनी मोठं शौर्य गाजवलं होतं. आता हेच श्वान मोदींच्या सुरक्षेसाठी सज्ज आहेत. चला जाणून घेऊया तीक्ष्ण नजर, शौर्य आणि प्रामाणिकपणाचं उत्कृष्ट उदाहरण असलेल्या मुधोळ हाऊंड श्वानाची वैशिष्ट्ये:
- मुधोळ हाऊंड श्वानांचा समावेश आता पंतप्रधानांच्या स्पेशल प्रॉटेक्शन ग्रुप अर्थात एसपीजीमध्ये करण्यात येणार आहे.
- त्यासाठी या श्वानांना चार महिने अत्यंत कठोर ट्रेनिंग दिलं जाणार आहे.
- मुधोळ हाऊंड कुत्र्यांची लांबी वैशिष्ट्यपूर्ण असते. लांब आणि उंच शरीर असणारे हे श्वान अतिशय चपळ असतात.
- उत्तम रोगप्रतिकारक क्षमता असल्यामुळं हे श्वान कमी थकतात आणि कमी आजारी पडतात.
- मुधोळ हाऊंड नजर अतिशय तीक्ष्ण असते. ते चाळीस 270 अशांत पाहू शकतात. तीक्ष्ण नजरेमुळे त्यांना साइट हाउंड असंही म्हटलं जातं.
- इतर श्वानांच्या तुलनेत त्यांची वास घेण्याची क्षमता तीव्र आहे. कुठल्याही हवामानात काम करण्याची त्यांची क्षमता आहे.
- एअरफोर्स, पॅरामिलिट्री, डीआरडीओ, राज्य पोलीस दलात मुधोळ हाऊंडसनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
- कर्नाटकात व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांच्या सुरक्षेसाठी मुधोळ हाऊंड तैनात असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेमध्येही मुधोळ हाऊंड श्वानांचा समावेश होता.
- आता त्यांच्यावर पंतप्रधानांच्या सुरक्षेची नवी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.