जबलपूर, 16 फेब्रुवारी: केसांची निगा न राखल्यास, स्वच्छता ठेवली नाही तर उवा (Lice) होण्याचा त्रास सहन करावा लागतो. जर त्यांना वेळीच काढलं नाही तर त्या वाढतात आणि डोक्यात खाज यायला सुरुवात होते. डोक्यात उवा असल्यास चारचौघांमध्ये लाजल्यासारखं होतं. उवा एकाकडून दुसऱ्याच्या डोक्यात जातात. त्यामुळे त्यांचा त्रास जास्त होतो. या समस्येवर विविध उपाय करून त्या नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. पण, त्या सहज जात नाहीत. जर संपूर्ण केस कापले म्हणजेच मुंडन केले तर उवा नष्ट होतात, असा अनेक लोकांचा विश्वास आहे. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये घडली आहे. स्नेह निकेतन नावाच्या मतिमंद मुलींच्या हॉस्टेलमध्ये काही मुलींच्या डोक्यात उवा झाल्या होत्या. यावर उपाय म्हणून हॉस्टेलच्या महिला अधीक्षकांनी येथे राहणाऱ्या विद्यार्थिनींचे मुंडणच करून टाकले. हॉस्टेलमधील अनेक विद्यार्थिनींना उवांचा त्रास होत होता. त्यामुळे मुंडण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे हॉस्टेलच्या व्यवस्थापनाने सांगितले. माध्यमांना याची माहिती मिळताच त्यांनी वसतीगृह गाठले आणि मुलींना पाहिले. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तीन विद्यार्थिनींनी याप्रकरणी लेखी तक्रार दिली आहे. पण, जबरदस्तीने मुंडण केल्याची तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. स्थानिक वृत्तपत्रानुसार, एकूण 24 विद्यार्थिनी सध्या हॉस्टेलमध्ये राहत आहेत. एकूण 24 विद्यार्थिनींपैकी 21 मानसिकदृष्ट्या कमकुवत आणि 3 सामान्य आहेत. येथे राहणाऱ्या मुलींचं आणि महिलांचं वय 8 ते 50 वर्षे आहे. झी न्यूज ने याबाबत वृत्त दिलं आहे. हे वाचा- Valentine’s Day दिवशीच प्रियकराचं वागणं लागलं जिव्हारी; तरुणीनं उचललं भयावह पाऊल हे प्रकरण सध्या चर्चेत आलं असून बाल हक्क संरक्षण आयोगासह बाल कल्याण समिती, बाल न्याय समितीने वसतिगृह अधीक्षकांना नोटीस बजावली आहे. उवांमुळे सर्व मुलींचे केस कापून मुंडण केल्याची बाब निदर्शनास आल्याचे बाल आयोगाचे सदस्य ब्रजेश चौहान यांनी सांगितले. याप्रकरणी नोटीसही पाठवण्यात आली होती. पण, अद्यापपर्यंत नोटिशीला उत्तर मिळालेलं नाही. हॉस्टेलमध्ये मतिमंद मुली आहेत. ज्यामध्ये अनेक मुलींना बोलता किंवा ऐकता येत नाही. उवांमुळे या मुलींना त्रास होत होता. म्हणून सर्व विद्यार्थिनींचे केस कापण्यात आले आहेत. तसेच आलेल्या नोटिसांना लवकरच उत्तर दिले जाईल, असे वसतिगृह अधीक्षकांनी सांगतिलं. हे वाचा- बॉयफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी केला हजारो किमी प्रवास, तिथे पोहोचताच बसला धक्का हे प्रकरण उघड झाल्यामुळे हॉस्टेलला नोटीस गेली आहे. त्यावर कारवाईही होईल पण त्या मुलींना झालेला त्रास मात्र भरून येणार नाही. अर्थात मुली मतिमंद असल्याने त्यांना हॉस्टेल प्रशासनाला विरोध करता आला नसावा. पण त्यामुळे प्रशासनाने कसेही निर्णय घेणं चुकीचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.