मुंबई, 28 एप्रिल : एचआयव्ही (HIV) हा जीवघेणा आजार समजला जातो. असुरक्षित लैंगिक संबंध हे या आजारामागचं प्रमुख कारण. या आजारावर ठोस उपचार उपलब्ध नसल्याने सुरक्षितता आणि सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. गेल्या दोन वर्षांपासून देश कोरोनाचा (Corona) सामना करत आहे. 2020-21 मध्ये कोरोनामुळे पहिल्यांदाच देशात दीर्घ काळ लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या कालावधीत सुमारे 85 हजारांहून जास्त नागरिकांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशननं (National AIDS Control Organisation - NACO) ही माहिती दिली आहे. 'वन इंडिया डॉट कॉम'नं याविषयीचं वृत्त दिलं आहे. 'डीएनए' आणि 'भास्कर' या माध्यमांनीही त्याबद्दल काही माहिती प्रसिद्ध केली आहे.
देशात 2020-21 मध्ये कोरोना लॉकडाऊनच्या काळात असुरक्षित लैंगिक संबंधामुळे 85 हजारांहून अधिक जणांना एचआयव्हीची लागण झाली आहे. यात महाराष्ट्रातल्या (Maharashtra) रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या कालावधीत महाराष्ट्रातले 10,498 रुग्ण एचआयव्ही पॉझिटिव्ह (HIV Positive) झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मध्य प्रदेशातले सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी माहिती अधिकारांतर्गत (RTI) माहिती मागवली होती. 'एनएसीओ'नं याबाबत माहिती दिली असून, त्यातून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. याबाबत 'एनएसीओ'ने असं म्हटलं आहे, 'एचआयव्ही पॉझिटिव्ह नागरिकांनी चाचणीपूर्वी किंवा नंतर समुपदेशनावेळी दिलेल्या उत्तरांच्या आधारे आयसीटीसी समुपदेशकानं संसर्गग्रस्तांची संख्या आणि संसर्गाचं कारण याबाबतची माहिती जमा केली आहे.'
('महाराष्ट्रात फक्त सत्तेचे भोगी', राज ठाकरेंचा मविआ सरकारवर निशाणा तर योगी आदित्यनाथांचे केले कौतुक!)
2020-21 मध्ये देशात संपूर्ण लॉकडाऊन होता. या काळात असुरक्षित लैंगिक संबंधामुळे देशातल्या 85,268 लोकांना एचआयव्हीची लागण झाली. त्यात महाराष्ट्रातल्या सर्वाधिक 10,498 व्यक्तींचा समावेश आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक आंध्र प्रदेशचा असून, त्या राज्यातल्या 9521 नागरिकांना एचआयव्हीची लागण झाली. तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक असून, त्या राज्यातल्या 8947 जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. अन्य राज्यांची आकडेवारी बघता, त्यात मध्य प्रदेशातल्या 3037, पश्चिम बंगालमधल्या 2757, गुजरातमधल्या 4590, उत्तर प्रदेशातल्या 6905, राजस्थानमधल्या 3488, बिहारमधल्या 5462 आणि तमिळनाडूतल्या 4883 जणांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे.
'एनएसीओ'नं दिलेल्या माहितीनुसार, मागील दशकात असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे (Unprotected sex) एचआयव्ही संसर्गाच्या घटनांमध्ये घट झाली आहे. 2011-12 मध्ये ही संख्या 2.4 लाख होती. 2019-20 मध्ये या संख्येत घट झाली. तेव्हा ही संख्या 1.44 लाख होती. 2020-21 मध्ये एचआयव्ही बाधितांच्या संख्येत आणखी घट झाली. या कालावधीत एकूण 85,268 जणांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचं दिसून आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.