Home /News /national /

देशभरात मान्सूनला ब्रेक; 7 जुलैनंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता

देशभरात मान्सूनला ब्रेक; 7 जुलैनंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता

देशात मान्सूनचं आगमन होऊन काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मात्र पूर्ण देशात मान्सून पोहोचण्याआधीच त्याच्या प्रवासात खंड पडल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे.

    नवी दिल्ली, 4 जुलै: देशात मान्सूनचं (Monsoon) आगमन होऊन काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मात्र पूर्ण देशात मान्सून पोहोचण्याआधीच त्याच्या प्रवासात खंड (Break) पडल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. मान्सूनचा प्रवास अर्ध्या वाटेतच थांबला असून ही शेतकऱ्यांसाठी (Farmers) आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी (Economy) चांगली घटना नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. नेमकं काय झालंय? भारतात जून ते सप्टेंबर हे चार महिने मान्सूनचे असतात. या काळात अनेकदा पाच ते दहा दिवसांचा खंड मान्सूनच्या पावसात पडतच असतो. मात्र मान्सून पूर्ण देशात पसरल्यानंतर आणि पवासाच्या सरींचा शिडकावा झाल्यानंतर काही आठवड्यांनी हा ब्रेक येतो. यावेळी मात्र पाऊस सुरू झाल्या झाल्या हा खंड पडल्यामुळं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. देशातील विविध भागातील तापमानात यामुळे वाढ होत असून दिल्लीत 1 जुलै रोजी 43.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. जुलै महिन्यात एवढं तापमान नोंदवलं जाण्याची गेल्या 9 वर्षांतली ही पहिली वेळ आहे. प्रवास कसा थांबला गेल्या दोन आठवड्यांपासून मान्सूनचे ढग पुढं सरकत नसल्याचं दिसून आलं आहे. पश्चिमेकडून जोरदार वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे पूर्वेकडून वाहणाऱ्या मान्सूनच्या थंड वाऱ्यांना पुढे सरकण्यात अडथळे येत असल्याचं हवामान तज्ज्ञ सांगतात. पश्चिमेकडून येणारे वारे हे मान्सूनला पुढे सरकण्यात अडथळा निर्माण करतात आणि त्यांचा प्रभावही कमी करत असल्याचं दिसून आलं आहे. पुढचा प्रवास कधी? देशात 7 जुलैपर्यंत मान्सूनची हीच स्थिती राहिल, असं सांगण्यात येत आहे. त्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सूनचा प्रवास जोरदार सुरू होईल, असं सांगितलं जात आहे. मात्र त्यामुळे प्रत्यक्ष पाऊस पडायला चार ते पाच दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं चित्र आहे. हे वाचा - देशात कोरोना लसीकरणाचे 169 दिवस पूर्ण, समोर आली महत्त्वाची माहिती सध्या मान्सून कुठे आहे? 30 जूनपर्यंत दिल्ली, पंजाब आणि चंदीगडच्या काही भागांचा अपवाद वगळता देशात बहुतांश ठिकाणी मान्सून पोहोचला आहे. साधारणपणे 8 जुलैपर्यंत मान्सूननं पूर्ण देश कवेत घेतल्याचं चित्र असतं. मात्र यावेळी हे चित्र दिसण्यासाठी थोडी अधिक प्रतीक्षा करावी लागेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पूर्ण देशात मान्सूच्या 4 महिन्यात सरासरी 880.6 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा 907 मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या थोडा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट या संस्थेनं वर्तवला आहे. या ब्रेकमुळे मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अगोदरच कोरोना संकटातून जाणाऱ्या अर्थव्यवस्थेला यामुळे अधिकच फटका बसण्याची चिंताही व्यक्त करण्यात येत आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Bay of bengal, India, Monsoon

    पुढील बातम्या