डोमिनिका, 07 जून: देशातील (India) पंजाब नॅशनल बँकेचं (Punjab National Bank) 13 हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून फरार झालेला हिरे व्यापारी (Diamantaire) मेहुल चोक्सी (Mehul Choksi) सध्या त्याच्या कथित अपहरण (Kidnapping) नाट्यामुळे चर्चेत आला आहे. अँटीग्वामधून (Antigua) डोमिनिकाला गेलेल्या चोक्सीनं आपल्याला भारतात परत नेण्यासाठी भारत सरकारनं जबरदस्तीनं डोमिनिकाला (Dominica) नेल्याचा आरोप केला होता. मात्र अँटीग्वा सरकार त्याला परत भारतात पाठविण्यासाठी तयार असल्याचं त्यानं स्वतःच आपल्या अपहरण नाट्याची कहाणी तयार केल्याची धक्कादायक माहिती भारतीय गुप्तचर स्रोतांनी उघडकीस आणली आहे. सीएनएन-न्यूज 18 ला त्यांनी ही माहिती दिली असून या प्रकरणात चोक्सीला मदत करणाऱ्या एका फरारी एजंटचे फोटोही सीएनएन-न्यूज 18 ला मिळाले आहेत. या व्यक्तीचा शोध घेण्यात येत असल्याचं अँटीग्वा पोलिसांनी सांगितलं आहे.
ही व्यक्ती चोक्सीला समुद्रमार्गे क्युबाला (Cuba) घेऊन जाणार होती. पण डोमिनिकामध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आल्यानं त्यांचा हा डाव फसल्याचं पोलीस चौकशी दरम्यान सिद्ध झालं आहे. अँटिग्वा सोडून क्युबामध्ये स्थायिक होण्याची चोक्सीची योजना असल्याचं तसंच चोक्सीकडं अँटिग्वा आणि बार्बुडासह आणखी एका कॅरेबियन देशाचे नागरिकत्व असल्याची माहिती अँटिग्वामधील चोक्सीचा जवळचा मित्र गोविन (Govin) यानं पोलिसांना दिली.
हेही वाचा- चांगली बातमी! सलग दुसऱ्या दिवशी देशातला कोरोना रुग्णांचा आकडा कमी
भारतीय बँकिंग क्षेत्राला हादरवून टाकणारा पंजाब नॅशनल बँकेतील कोट्यवधीचा घोटाळा उजेडात येण्याच्या काही आठवडे आधीच जानेवारी 2018मध्ये चोक्सी आणि त्याचा पुतणा नीरव मोदी भारतातून पळून गेले होते. बँकेच्या अधिकाऱ्यांना लाच देऊन या दोघांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) मिळवलं आणि त्या आधारावर परदेशी बँकांकडूनही कर्ज घेतलं. हे सगळं कर्ज थकवून हे दोघं दिल्लीतून परदेशात फरार झाले. अँटिग्वा आणि बार्बुडा इथं नागरिक म्हणून दोन वर्षे वास्तव्य करणारा चोक्सी 23 मे रोजी अचानक गायब झाला आणि शेजारच्या डोमिनिका या देशात बेकायदेशीररित्या प्रवेश करताना त्याला पकडण्यात आलं. अँटिग्वामधील जॉली हार्बर येथून अँटीग्वा आणि भारतीयांसारख्या दिसणाऱ्या अँटिग्वा पोलिसांनी त्याचं अपहरण केलं आणि त्याला डोमिनिका इथं आणल्याचा आरोप त्याचे वकील विजय अगरवाल यांनी केला.
मात्र, चोक्सीनं आपलं प्रत्यार्पण टाळण्यासाठी ही बनावट कहाणी रचल्याचं भारतीय गुप्तचर खात्यानं म्हटलं आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर सर्व तपशील जाहीर केला जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे. अँटिग्वा सरकारच्या म्हणण्यानुसार, भारतात प्रसारित होत असलेल्या याबाबतच्या बातम्या या चोक्सीचे कुटुंबीय आणि वकिलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दिल्या जात आहेत. त्यात तथ्य नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दोन बोटी वापरून चोक्सीनं डोमिनिका बेटावर प्रवेश केला असं माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. मात्र चोक्सीच्या गायब होण्याची वेळ आणि बोटींची वेळ यात तफावत असल्याचंही अँटिग्वाच्या सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे.
अँटिग्वा आणि बार्बुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउन (Gaston Brown) हे चोक्सीला भारतात परत पाठविण्यासाठी कटीबद्ध असल्याची जाणीव त्याला होती, त्यामुळं त्यानं हा देश सोडण्याचाही योजना आखली. इंटरपोलनं (Interpol) त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस (Red Corner Notice) बजावल्यानं अधिकृतपणे या देशातून बाहेर जाणं त्याला शक्य नसल्यानं त्यानं ही कहाणी रचली, असंही सरकारी सूत्रांनी स्पष्ट केलं.
अंगावरील जखमा (Bruises) आणि रक्ताळलेला, सुजलेला डोळा हे काही अपहरणाचे पुरावे म्हणून ग्राह्य धरता येणार नाहीत, असं स्पष्ट करत चोक्सी आणि त्याचे साथीदार मूळ मुद्द्यापासून दिशाभूल करण्यासाठी हा सगळा बनाव करत असल्याचा दावा अँटिग्वा सरकारनं केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, International, Pnb bank