नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी : नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचं चित्र पाहिलं तर आर्थिक मंदी (Indian Economy) दूर होण्याचे संकेत मिळतायत. रॉयटर्स या न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार नव्या ऑर्डर मिळाल्यामुळे भारतातल्या उत्पादनात (Indian Manufacturing Activity) वेगाने वाढ होते आहे. ही उत्पादनातली वाढ गेल्या 8 वर्षांतली सर्वाधिक वाढ आहे.
निक्केई मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स(Nikkei PMI)नुसार डिसेंबरमधल्या 52.7 च्या तुलनेत मार्केट 55.3 वर पोहोचलं आहे. फेब्रुवारी 2012 नंतरची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. रिपोर्टमध्ये म्हटल्यानुसार, बाजारपेठेत मागणीमध्ये सुधारणा झाल्याचं चित्र दिसतं आहे. सोमवारी जारी झालेल्या मासिक सर्वेक्षणानुसार जानेवारीमध्ये देशातल्या उत्पादनाबद्दलच्या घडामोडी 8 वर्षांत सगळ्यात सर्वोच्च स्थानावर आहेत. यामध्ये उत्पादन आणि रोजगाराबदद्ल प्रगती झाली आहे.
कशी झाली सुधारणा?
कंपन्यांकडे नव्या ऑर्डर्स आल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. आर्थिक मंदी दूर होण्यासाठी मागणी आणि पुरवठ्याचं गणित वाढवणं गरजेचं आहे. त्याच दृष्टीने जर मागणी वाढली तर पुरवठ्यातही वाढ होईल. कंपन्यांच्या एकूण विक्रीत परदेशातल्या बाजारपेठेतून आलेल्या मागणीची महत्त्वाची भूमिका आहे. नोव्हेंबर 2018 नंतर निर्यातीच्या नव्या ऑर्डर्समध्ये सगळ्यात वेगाने वाढ आहे. रोजगाराच्या आकडेवारीतही जानेवारी महिन्यात चांगलीच सुधारणा झाली आहे, असं आकडेवारी सांगते. हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत आहेत.
अर्थव्यवस्थेला दिलासा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला. भारताची अर्थव्यवस्था मंदीसदृश स्थितीतून बाहेर येते आहे. त्यासाठी मागणी आणि पुरवठा वाढवण्याला प्रोत्साहन द्यावं लागेल, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यामुळेच उत्पादनात झालेली वाढ अशीच सुरू राहिली तर हा मोठा दिलासा ठरेल.
==============================================================================