'तेजस'च्या निर्मितीतलं तेज हरपलं, अब्दुल कलमांचे खास मित्र डॉ. मानसबिहारी वर्मा यांचं निधन

'तेजस'च्या निर्मितीतलं तेज हरपलं, अब्दुल कलमांचे खास मित्र डॉ. मानसबिहारी वर्मा यांचं निधन

शास्त्रज्ञ डॉ. मानसबिहारी वर्मा (Dr Manasbihari Verma) यांचं सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाणारे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याशी त्यांची दृढ मैत्री होती.

  • Share this:

दरभंगा (बिहार) 04 मे : तेजस या वजनाने हलक्या असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण भारतीय लढाऊ विमानाच्या निर्मितीमध्ये प्रमुख सहभाग असलेले शास्त्रज्ञ डॉ. मानसबिहारी वर्मा (Dr Manasbihari Verma) यांचं सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाणारे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याशी त्यांची दृढ मैत्री होती. डॉ. वर्मा यांच्या निधनामुळे देशाच्या संरक्षण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारा शास्त्रज्ञ गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

बिहारसारख्या (Bihar) मागास राज्यातल्या दरभंगा (Darbhanga) जिल्ह्यात घनश्यामपूर ब्लॉकमधल्या बाउर (Baur) या छोट्याशा गावात 29 जुलै 1943 रोजी मानसबिहारी वर्मा यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव किशोरलाल दस असं होतं. तीन भाऊ आणि चार बहिणी अशा मोठ्या कुटुंबात वाढलेल्या मानसबिहारींनी मधेपूरच्या जवाहर हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पाटण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून आणि कोलकाता विद्यापीठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं.

डॉ. मानसबिहारी यांनी तब्बल 35 वर्षं संरक्षण संशोधन विकास संघटना अर्थात डीआरडीओ (DRDO) या संस्थेत एरॉनॉटिकल सायन्टिस्ट (Aeronautical Scientist) म्हणून मोठं काम केलं. बंगळुरू, नवी दिल्ली आणि कोरापुट इथल्या विमानविषयक वेगवेगळ्या विभागांमध्येही त्यांनी काम केलं. दिवंगत माजी राष्ट्रपती आणि मिसाइलमॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (Dr A. P. J. Abdul Kalam) यांच्यासोबत दीर्घ काळ काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यामुळे त्या दोघांची मैत्री घनिष्ठ होती.

1986 साली तेजस (Tejas) या हलक्या लढाऊ विमानांच्या (Light Combat Aircraft) निर्मितीसाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली होती. त्यात तब्बल 700 इंजिनीअर्सचा समावेश होता. डॉ. वर्मा यांनी त्या टीमचे मॅनेजमेंट प्रोग्राम डायरेक्टर म्हणून जबाबदारी सांभाळली.

डीआरडीओ या संस्थेतून ते जुलै 2005 मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर ते बंगळुरूमधून पुन्हा आपल्या मातृभूमीत परतले. नुसते परतले नाहीत, तर त्यांनी आपल्या गावाच्या, जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी उपक्रम राबवले. दरभंगा जिल्ह्यातलं असं एकही गाव नाही, की जिथे त्यांची टीम पोहोचलेली नाही. ज्या शाळांमध्ये विज्ञान शिक्षक नाहीत किंवा कमी आहेत, त्या शाळांमध्ये जाऊन डॉ. मानसबिहारींची टीम मुलांना वैज्ञानिक प्रयोग दाखवते, करण्याची संधी देते. मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून एकेका शाळेत दोन-तीन महिन्यांचं शिबिर घेऊन मुलांना विज्ञान, कम्प्युटर आदींचं मूलभूत ज्ञान दिलं जातं.

डॉ. मानसबिहारी यांच्या अशा भरीव योगदानामुळे त्यांना अनेक सन्मानही मिळाले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांची सायन्टिस्ट ऑफ दी इयर या पुरस्कारासाठी निवड केली होती. 2018 साली त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं.

Published by: Kiran Pharate
First published: May 4, 2021, 11:17 AM IST

ताज्या बातम्या