रायपूर, 02 जुलै : असे बरेच तरुण आहेत ज्यांचं काही ना काही कारणामुळे लग्न होत नाही आहे. वय वाढत जातं पण लग्नासाठी मुलगी मिळत नाही आहे. लग्न व्हावं यासाठी किती तरी उपायही केले जातात. लग्नात अशाच अडचणी येणाऱ्या एका तरुणाला चक्क शेणामुळे नवरी मिळाली आहे. शेणामुळे असा चमत्कार झाला की मुलीचं कुटुंब या तरुणावर इम्प्रेस झालं आणि त्यांनी आपल्या लेकीचं या तरुणाशी लग्न लावून दिलं. छत्तीसगढमधील या दाम्पत्याच्या लग्नाची गोष्ट सध्या चर्चेत आली आहे (Man selling cow dung get married).
असं म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. तसंच विवाह संस्था, मॅरेज ब्युरो, मॅट्रिमोनिअल वेबसाइट्स किंवा अॅपमार्फत आपल्याला हवा तसा जोडीदार मिळतो. पण या दाम्पत्याची जोडी बनली ती शेणामुळे (Godhan yojna).
मनेंद्रगढमध्ये राहणारा श्यामकुमार जायसावल. ज्याच्या लग्नात बरेच अडथळे येत होते. पण शेणामुळे त्याचं आयुष्य पालटलं किंबहुना शेणाने चमत्कारच केला. सरकारच्या गोधन न्याय योजनेअंतर्गत शेण विकून तो लखपती झाला आणि त्यामुळे एका तरुणीचं कुटुंब इतकं इम्प्रेस झालं की त्यांनी तिचं लग्न श्याकुमारशी लावून दिलं. 19 जूनला श्यामकुमारचं लग्न अंजू नावाच्या तरुणीसोबत झालं. श्यामकुमारने सांगितलं, गोधन न्याय योजनेमुळे त्याच्या लग्नातील अडथळा दूर झाला आणि त्याला आयुष्याची जोडीदार मिळाली.
हे वाचा - DTH Dish Recharge संपताच बायकोने मागितला Divorce; नवऱ्याला म्हणाली, 'TV नहीं तो बीवी नहीं'
राज्य सरकारने केलेल्या एका जाहिरातीनुसार पशुपालन करणाऱ्या श्याम कुमारचं उत्पन्न खूप कमी होतं. त्याने दूध डेअरीचा व्यवसाय सुरू केला होता. पण दुधाइतकीच उत्पनन्न मिळायचं. त्यावर मुश्किलीने त्यांचा उदरनिर्वाह होत होता. सुरुवातीला प्राण्यांचं शेण वायाच जात होतं. पण गोधन न्याय योजना लागू झाल्यानंतर त्याने शेण विकायला सुरुवात केली. आतापर्यंत त्याने 2 लाख 5 हजार किलो गोबर विकलं. त्यातून त्याला 4 लाख 10 हजार रुपये मिळाले.
त्याची पत्नी अंजू नर्सिंग स्टाफ आहे. तिने सांगितलं, माझ्या लग्नासाठी स्थळ शोधले जात होते. त्यावेळी कुटुंबाला श्याम कुमारबाबत समजलं. तो शेण विकून चांगली कमाई करत असल्याची माहिती मिळाली. तसंच आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ते खूप मेहनत करत होते. यामुळे तिचे वडील आणि कुटुंबातील इतर सदस्य प्रभावित झाले आणि अंजूचं लग्न श्यामकुमारशी लावण्याची तयारी दर्शवली.
हे वाचा - 'नवरा भाड्याने देणं आहे', बायकोने सोशल मीडियावर दिली जाहिरात; कारणही आहे शॉकिंग
छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल सध्या नागरिकांची भेट घेत आहेत. बुधवारी कोरिया जिल्ह्यात ते गेले असता चर्चेदरम्यान गोधन न्याय योजनेचा विषय निघाला. त्यावेळी या नवविवाहित दाम्पत्याने आपल्या लग्नाचा किस्सा मुख्यमंत्र्यांना सांगितला. या योजनेचा आपल्या आयुष्यात किती मोठा फायदा झाला हे त्यांनी सांगितलं.
तरुणाच्या लग्नातील अडथळे शेण विकल्याने दूर झाले, शेण विक्रीतून झालेल्या कमाईमुळे त्याचं लग्न झालं, असा दावा केला जातो आहे. शेण विकणं किंवा शेणासंबंधी व्यवसाय करणं तुम्हाला कमीपणाचं वाटत असेल पण ते किती फायद्याचं आहे, हे इथं दिसून येतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Couple, Relationship, Wedding