शिमला 03 सप्टेंबर : गेली दोन वर्षं कोरोनाने (Corona) जगभरात हाहाकार माजवला होता. दोन वर्षांच्या काळात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या संसर्गजन्य आजारापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी लसींचा (Vaccine) शोध लावला. चाचण्यांनतर लसींना मान्यता देण्यात आली आणि नंतर लसीकरण मोहीम (Vaccination Drive) राबवण्यात आली.
भारत सरकारने कोरोनासारख्या साथीच्या आजाराला रोखण्यासाठी सुरू केलेली लसीकरण मोहीम आता बेपत्ता लोकांचा शोध घेण्यातही मदत करत आहे. आता तुम्ही विचार करत असाल की हे कसं काय? तर, नुकतंच एक प्रकरण हिमाचल प्रदेशामधून (Himachal Pradesh) समोर आलंय. मंडी (Mandi) जिल्हा मुख्यालयाला लागून असलेल्या सद्याणा (Sadyana) गावातील 22 वर्षीय नेहाला शोधण्यात कोरोना लसीने (Corona Vaccine) महत्त्वाची भूमिका बजावली.
Good News : ट्वीटरवर पोस्ट केलेली माहिती आता एडिट करता येणार
कौटुंबिक कारणामुळे नेहा (Neha) घर सोडून कुठे तरी निघून गेली होती. नेहाचा पती मोनू ठाकूर (Monu Thakur) यांनी 14 जुलै 2022 रोजी सदर पोलीस ठाण्यात नेहा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी नेहाला सर्वत्र शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा कुठेही पत्ता लागला नाही. दीड महिन्यापासून मोनूचं संपूर्ण कुटुंब नेहाला शोधत होतं. तिची दोन मुलंही आईसाठी रडत होती. याचदरम्यान, गुरुवारी 1 सप्टेंबर 2022 रोजी मोनूच्या मोबाईलवर (Mobile) एक मेसेज (Message) आला. हा मेसेज कोविड लसीकरणाविषयी होता, ज्यामध्ये बेपत्ता नेहाने कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याची माहिती देण्यात आली होती. नेहाने ही लस शिमल्यातील तुतीकांडी येथील आरोग्य केंद्रात (Health Center) घेतली होती.
हा मेसेज घेऊन मोनू पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि पोलिसांना कळवलं. मंडीच्या एसपींच्या सूचनेवरून स्टेशनचे प्रभारी इन्स्पेक्टर पुरुषोत्तम धीमान यांनी तत्काळ एक टीम तयार करून शिमल्याला पाठवली. यानंतर नेहा तिथे एका ढाब्यावर (Dhaba) काम करताना आढळली. यानंतर पोलिसांनी नेहाला मंडीला परत आणलं आणि तिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आलं.
मंडीच्या एसपी शालिनी अग्निहोत्री यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. कोविड लसीकरणामुळे बेपत्ता नेहाबद्दल अचूक माहिती मिळाली आणि आता तिला तिच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आलंय, असं त्यांनी सांगितलंय. अशा रितीने कोरोना लसीने बेपत्ता झालेल्या एका महिलेचा शोध घेण्यास मदत केली. दोन लहानग्या मुलांना त्यांची आई परत मिळाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Vaccine