भोपाळ, 19 मे: मागील काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या वाढतंच चालली आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट अत्यंत घातक बनत असून अनेक लोकांनी कोरोनाचा धसका घेतला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याच्या भीतीतून (fear of corona infection) अनेकजण चित्र विचित्र उपचारांचा अवलंब करत आहेत. लोकांमध्ये कोरोनाची भीती किती पसरली आहे, याची पुष्टी करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका युवकानं कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या भीतीतून थेट रॉकेल प्यायला (man drink Kerosene) आहे. प्रमाणापेक्षा अधिक रॉकेल प्यायल्यानं संबंधित युवकाचा मृत्यू झाला आहे. पण मृत्यूनंतर जेव्हा त्याची कोरोना चाचणी केली असता वेगळाच खुलासा झाला आहे. ही घटना मध्य प्रदेशातील भोपाळ याठिकाणी घडली आहे. महेंद्र (वय 30) असं या युवकाचं नाव आहे. महेंद्र मागील काही दिवसांपासून तापानं फणफणला होता. आपल्याला ताप आला आहे. औषधोपचार करूनही ताप जात नाही. यामुळे आपल्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याची शंका त्याला आली. यानंतर त्याच्या एका मित्रानं त्याला कोरोनामधून बरं होण्यासाठी रॉकेल पिण्याचा सल्ला दिला. मित्राच्या सल्ल्यानुसा , त्यानं रॉकेल पिलं. पण रॉकेल पिल्यानंतर त्याची प्रकृती अधिकच बिकट झाली. यानंतर कुटुंबीयांनी महेंद्रला त्वरित रुग्णालयात दाखल केलं. पण शेवटी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. झी 24 तास नं दिलेल्या वृत्तानुसार, मृत महेंद्रला मागील 6 दिवसांपासून सातत्यानं ताप येत होता. भोपाळमध्ये टेलरचं काम करणाऱ्या महेंद्र यांना औषधोपचार केल्यानंतरही संभाव्य फरक पडत नव्हता. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली असावी असा संशय त्यांच्या मनात आला. त्यामुळे त्यांनी एका मित्राच्या सल्ल्यानं रॉकेल प्यायलं. हे ही वाचा- कोरोना की आणखी काही; Mucormycosis रुग्ण वाढण्यामागे नेमकं काय आहे कारण? रॉकेल पिल्यानंतर महेंद्रची प्रकृती खालावली. त्यामुळे घरातील लोकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. परंतु, तिथे बेड उपलब्ध नसल्यानं त्याला प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं. पण याठिकाणी त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालय प्रशासनानं महेंद्र यांच्या मृत्यूनंतर त्यांची कोरोना चाचणी केली. ज्यामध्ये महेंद्रची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. पण कोरोना झाल्याच्या भीतीनं भलताचं उपचार केल्यानं त्यांना जीव गमवावा लागला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.