नवी दिल्ली, 19 मे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नवं संकट येऊन ठेपलं आहे ते म्हणजे म्युकोरमायकॉसिसचं (Mucormycosis). कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना हे जीवघेणं फंगल इन्फेक्शन होत आहे. यामुळे कित्येकांचा जीव गेला आहे. तर कित्येकांचा जीव वाचवण्यासाठी त्यांचे डोळे काढावे लागले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्युकोरमायकॉसिसचं रुग्ण अचानक का वाढले असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनाकाळात (Corona) ऑक्सिजनची (Oxygen) कमतरता भासत असल्याने प्रत्येकाने आपल्या नातेवाईकाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु होम आयसोलेशन आणि रुग्णालयांमध्ये काही प्रमाणात निष्काळजीपणा दिसून आला. त्यामुळे आज ज्या ऑक्सिजनच्या आधारे कोरोनाग्रस्तांवर उपचार केले जात आहेत, ज्या ऑक्सिजनच्या आधारे रुग्णांचा जीव वाचवला जात आहे, तो ऑक्सिजन आता बुरशीजन्य म्युकोरमायकॉसिस (Mucormycosis) या आजाराचे प्रमुख कारण ठरत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यामागे 2 मोठी कारणं आहेत. त्यातील पहिलं कारण म्हणजे, दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा गेल्या काही दिवसांपासून भासत आहे. जो ऑक्सिजन औद्योगिक कारणासाठी (Industrial Use) वापरला जातो तो रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये पाठवा, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. होम आयसोलेशनमधील (Home Isolation) रुग्णांनादेखील ऑक्सिजनची कमतरता भासत होती. त्यामुळे अनेक लोकांनी औद्योगिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजनचा उपयोग घरामध्ये केला. या सिलिंडर्समध्ये 100 टक्के शुद्ध ऑक्सिजन नसतो. त्यात काही प्रमाणात तेलाचाही वापर केला जातो. त्यामुळे व्यक्ती कोरोनामुक्त झाली पण बुरशीजन्य विकाराची शिकार झाली.
हे वाचा - कोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश
दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर (Oxygen Concentrator). यामध्ये डिस्टील्ड वॉटरचाच (Distilled Water) वापर करावा,अशा स्पष्ट मार्गदर्शक सूचना आहेत. परंतु जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य कोरोना संक्रमित होतात, तेव्हा असं पाणी कुठून आणणार. त्यामुळे बहुतांश लोकांनी नळाच्या पाण्याचा वापर या कॉन्सनट्रेटरमध्ये केला. या पाण्यात बॅक्टेरिया किंवा फंगस असण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा व्यक्तींना काळ्या बुरशीची म्हणजेच म्युकरमोयक्रोसिसची लागण झाल्याचं दिसून येते.
तज्ज्ञ काय म्हणतात?
एम्सचे (AIIMS) प्रोफेसर पवन तिवारी यांनी याबाबत सांगितले, म्युकरमायकॉसिसही अशी बुरशी (Fungus) आहे जिचं वास्तव्य सर्वत्र असतं. जिथं ओलावा असतो किंवा सामान, फळे, भाज्या सडतात तिथं ही बुरशी आढळते. ही बुरशी आपल्या नाकावाटे श्वास नलिकेतून शरीरात प्रवेश करते. ही बुरशी आपल्या शरीरात सहजतेने साफ केली जाते. परंतु रुग्णालयात दाखल केलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 2 ते 3 जोखमीचे घटक असतात. एक तर गंभीर कोरोनाग्रस्त रुग्णाला ऑक्सिजन लावला असेल किंवा त्यास स्टेरॉईड तसंच अँटिबायोटिक औषधं दिली असावीत. यामुळे त्यांची ब्लड शुगर लेव्हल अनियंत्रित होते. अशा स्थितीत स्टेरॉईडस देऊनही त्यांची शुगर लेव्हल नियंत्रणात येत नाही. अशातच असा रुग्ण कोरोना मुक्त झाल्यावर त्यास म्युकोरमायकॉसिसची लागण होते. काही रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर स्टेरॉईड घेण्यास सांगितलं जातं.
रुग्णांना ऑक्सिजनच्या माध्यमातून जे पाणी दिलं जातं. ते खराब असेल तरीदेखील म्युकोरमायकॉसिस होऊ शकतो. अशा रुग्णांची शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. ऑक्सिजनची गरज नसेल तर तो देऊ नये. गरज नसेल तर स्टेरॉईडस घेऊ नयेत. रुग्णालयात भरती व्हावं लागलं तर ऑक्सिजनमध्ये शुद्ध पाण्याचा वापर करावा. नळाचं पाणी वापरू नये, असा सल्ला तिवारी यांनी दिला आहे.
हे वाचा - मुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट
इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) महासचिव डॉ. जयेश लेले यांनी सांगितलं, काळी बुरशी हे एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन आहे. आज जो औद्योगिक ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णालयांना केला जातो आहे, त्याचा वापर करताना पुरेशी काळजी घेतली जात नाही. त्यामुळे संसर्ग वाढत आहे. ऑक्सिजन पुरवठ्यावेळी जे पाणी वापरलं जातं त्यावर नीट लक्ष दिलं जात नाही. सिलेंडर सॅनिटाईज्ड केला जात नाही. स्टेरॉईडचा वापर तर पूर्वीपासूनच होत आहे. होम आयसोलेशनमधील रुग्णाला ऑक्सिजन पुरवठा करताना डिस्टिल्ड पाण्याचा वापर केला जात नाही, त्याऐवजी नळाचं पाणी वापरलं जातं. म्युकरमायकोसिसच्या वाढत्या संसर्गामागे हेदेखील एक कारण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus