मराठी बातम्या /बातम्या /देश /काँग्रेसचे नवे बॉस खर्गेंसमोर ही दोन आव्हानं मोठी; नंतरचा काळही सोपा नाही, सोनिया म्हणाल्या..

काँग्रेसचे नवे बॉस खर्गेंसमोर ही दोन आव्हानं मोठी; नंतरचा काळही सोपा नाही, सोनिया म्हणाल्या..

खरगेंचा राजकीय प्रवास

खरगेंचा राजकीय प्रवास

पदभार स्वीकारण्यापूर्वी खर्गे यांनी राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनाही त्यांनी आदरांजली वाहिली.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : काँग्रेस अध्यक्षपदाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी खासदार शशी थरूर यांचा पराभव केला. त्यामुळे सुमारे अडीच दशकांनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष विराजमान होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. अखेर आज, बुधवार (26 ऑक्टोबर 2022) रोजी खर्गे यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे.

  खर्गे यांनी बुधवारी औपचारिकपणे काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. या वेळी पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी-वाड्रा यांच्यासह पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ‘आजचा दिवस माझ्यासाठी खूप भावनिक आहे. एका सामान्य कार्यकर्त्याची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करून हा सन्मान दिल्याबद्दल आज मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.’

  दरम्यान, पदभार स्वीकारण्यापूर्वी खर्गे यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. तसंच माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनाही त्यांनी आदरांजली वाहिली. तर, पदभार स्वीकारण्यापूर्वी खर्गे यांनी काल, मंगळवारी (25 ऑक्टोबर 2022) माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.

  सोनिया गांधींनी केले खरगेंचे अभिनंदन, म्हणाल्या...

  खर्गे यांच्याकडे पक्षाचं नेतृत्व सोपवताना सोनिया गांधी म्हणाल्या, ‘ खर्गे हे अनुभवी नेते आहेत. आज मी एका मोठ्या जबाबदारीतून मुक्त होत आहे. मला खात्री आहे की, त्यांच्याकडून संपूर्ण पक्षाला प्रेरणा मिळेल, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस मजबूत होत राहील. मी खर्गे यांचे अभिनंदन करते. ते अनुभवी नेते आहेत, ही सर्वांत मोठी समाधानाची गोष्ट आहे. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून खर्गे यांनी आपल्या मेहनतीनं आणि झोकून देऊन काम करीत ही उंची गाठली आहे.’

  वाचा - मुस्लिमबहुल इंडोनेशियन नोटांवर लक्ष्मी-गणेश, मग इथं का नाही? केजरीवालांची केंद्राकडे मागणी

  सोनिया गांधी पुढे म्हणाल्या,’ इतकी वर्षे तुम्ही सर्वांनी दिलेलं प्रेम, आदर ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मला हे लक्षात राहिल. काँग्रेस अध्यक्ष म्हणून मी माझ्या क्षमतेनुसार जबाबदारी पार पाडली. या जबाबदारीतून मुक्त झाल्यामुळे मला थोडं बरे वाटत आहे.’

  काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांसमोर ही असतील आव्हानं

  काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर खर्गे यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान हे राजस्थान येथील काँग्रेस सरकावर आलेले राजकीय संकट दूर करणे हे आहे. तसेच येत्या काही आठवड्यांत होऊ घातलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका हेही त्यांच्यासमोरील मोठं आव्हान आहे. या दोन्ही राज्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची मजबूत पकड आहे. तर, सध्या राजस्थान आणि छत्तीसगड या दोनच राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. याशिवाय, पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये खर्गे हे ज्या राज्यातील आहेत, त्या कर्नाटकचाही समावेश आहे. या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवून देण्याचे आव्हानं त्यांच्यासमोर आहे. तसेच 2024 ची लोकसभा निवडणूक खर्गे यांच्यासाठी सर्वात मोठी परीक्षा असेल.

  काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती

  काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे पदभार स्वीकारताना काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात सर्वात प्रथम पक्षाचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी खर्गे यांना निवडणूक प्रमाणपत्र सुपूर्द केले. यावेळी व्यासपीठावर सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल, केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे सदस्य राजेश मिश्रा, अरविंदर सिंग लवली आणि ज्योती मणी उपस्थित होते. या कार्यक्रमाला काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य, प्रदेश काँग्रेस समित्यांचे अध्यक्ष आणि पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात गेहलोत यांच्यासोबत राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटही उपस्थित होते. राजस्थानच्या राजकीय पेचप्रसंगात बऱ्याच काळानंतर हे दोन्ही नेते एकत्र दिसले.

  या कार्यक्रमाच्या निमित्ताने, 7 सप्टेंबरपासून भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर राहुल गांधींनी पहिल्यांदाच दिल्लीत काँग्रेसच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. 27 ऑक्टोबरपासून ते पुन्हा यात्रेत सामील होणार आहेत. भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणामध्ये आहे.

  24 वर्षांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती

  दलित समाजातील 80 वर्षीय ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी 17 ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरूर यांचा पराभव केला. पक्षाच्या 137 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. यामध्ये 24 वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून आली. त्यामुळे खर्गे हे त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात पक्षाच्या हितासाठी कशा प्रकारे कामगिरी करतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

  First published:

  Tags: Rahul gandhi, Sonia gandhi