नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करून तिच्या जागी 47 सदस्यांची सुकाणू समिती स्थापन केली. या समितीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र, यात त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरुर यांना मोठा दणका दिला आहे.
पक्षाच्या पूर्ण अधिवेशनात खर्गे यांच्या निवडीची पुष्टी झाल्यानंतर नवीन CWC तयार होईपर्यंत खर्गे यांच्या अध्यक्षतेखालील अंतरिम समिती काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) जागा घेईल. या समितीमध्ये पूर्वीच्या CWC मधील बहुतेक सदस्यांना कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, पक्षाचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर यांना त्यात स्थान देण्यात आलेले नाही.
काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, समितीच्या सदस्यांमध्ये पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या प्रियांका गांधी वॉड्रा, एके अँटनी, अंबिका सोनी, आनंद शर्मा, केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला आणि दिग्विजय सिंह यांचा समावेश आहे. वेणुगोपाल म्हणाले, "भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या घटनेच्या कलम 15 (बी) नुसार, काँग्रेस अध्यक्षांनी एक सुकाणू समिती स्थापन केली आहे, जी काँग्रेस कार्यकारिणीच्या जागी काम करेल."
वाचा - काँग्रेसचे नवे बॉस खर्गेंसमोर ही दोन आव्हानं मोठी; नंतरचा काळही सोपा नाही, सोनिया म्हणाल्या..
सीडब्ल्यूसी ही काँग्रेसची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. सुकाणू समिती आता खर्गे यांच्या निवडीची पुष्टी होईपर्यंत पक्षाच्या पूर्ण अधिवेशनात सर्व निर्णय घेईल, ज्यामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सर्व प्रतिनिधींचा समावेश असेल. हे अधिवेशन पुढील वर्षी मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांसमोर ही असतील आव्हानं
काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर खर्गे यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान हे राजस्थान येथील काँग्रेस सरकावर आलेले राजकीय संकट दूर करणे हे आहे. तसेच येत्या काही आठवड्यांत होऊ घातलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका हेही त्यांच्यासमोरील मोठं आव्हान आहे. या दोन्ही राज्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची मजबूत पकड आहे. तर, सध्या राजस्थान आणि छत्तीसगड या दोनच राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. याशिवाय, पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये खर्गे हे ज्या राज्यातील आहेत, त्या कर्नाटकचाही समावेश आहे. या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवून देण्याचे आव्हानं त्यांच्यासमोर आहे. तसेच 2024 ची लोकसभा निवडणूक खर्गे यांच्यासाठी सर्वात मोठी परीक्षा असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rahul gandhi, Shashi tharoor, Sonia gandhi