मुंबई, 10 फेब्रुवारी: एखादी वस्तू खरेदी करताना बऱ्याचदा ग्राहकांची फसवणूक होते. बरेच दुकानदार, शॉपिंग मॉल आणि हॉटेल मालक वस्तूमागे वाढीव किंमती, एका पिशवीमागे पैसे त्याचसोबत जीएसटीच्या नावाने अतिरिक्त बिल आकारतात. अशी फसवणूक झाल्याचा अनुभव आल्यानंतर ग्राहक दाद मागण्यासाठी थेट ग्राहक न्यायालयात धाव घेतात. अशीच एक घटना हैदराबादमध्ये घडली आहे. या ठिकाणच्या एका प्रसिद्ध मॉलला पिशवीमागे 10 रुपये आकारणं महागात पडलं आहे, असं वृत्त
तेलंगणा टुडे या वेबसाइटवर दिली आहे.
पुंजगुट्टा येथील हैदराबाद सेंटर मॉलला (hyderabad central mall) एका कागदाच्या पिशवीमागे 10 रुपये आकारल्यामुळे एका ग्राहकाला नुकसान भरपाई म्हणून 15 हजार रुपये देण्याचे आदेश ग्राहक विवाद निवारण आयोगने (Consumer Disputes Redressal Commission) दिले आहे. या मॉलमधील स्टोअरमध्ये वस्तू खरेदी केल्यानंतर दिल्या जाणाऱ्या कागदाच्या एका पिशवीमागे 10 रुपये आकारले जातात. या पिशवीवर मॉलच्या नावाचा लोगो आहे.
कावडीगुडा येथे राहणारे व्ही. बज्जम यांनी याप्रकरणी ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे धाव घेत मॉलविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांनी या मॉलमधील एका स्टोअरमधून 1400 रुपयांचा शर्ट खरेदी केला होता. या स्टोअरकडून त्यांना मॉलच्या नावाचा लोगो असलेली कागदी पिशवी देण्यात आली. या कागदी पिशवीसाठी त्यांच्याकडून 10 रुपये घेण्यात आले.
हे वाचा - बँक ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, एकाच दिवसात क्लिअर होणार चेक
अशाप्रकारे मॉलची लोगो असलेल्या कागदी पिशवीमागे 10 रुपये आकारणे हे बेकायदेशीर असल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट ग्राहक विवाद निवारण आयोगकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत आयोगाने मॉलला नुकसान भरपाई म्हणून त्यांना 15 हजार रुपये देण्यास सांगितले आहे.
दरम्यान, अनेक मॉलमध्ये एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर पिशव्या फुकट देतात पण अनेक ठिकाणी एका पिशवीमागे त्यांना वाटेल तेवढे शुल्क आकारतात. अशा घटना नेहमीच समोर येत असतात. अशाप्रकारे पिशवीसाठी शुल्क आकारणे हैदराबाद सेंट्रल मॉलला महागात पडले. या घटनेमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे कारण यापुढे या पिशवीसाठी त्यांना 10 रुपये द्यावे लागणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.