इंदूर, 22 जून : देशात सध्या कोरोना लसीकरणाला (Corona vaccination) वेग आला आहे. 21 जूनपासून 18+ सर्वांचं केंद्र सरकारमार्फत मोफत लसीकरण सुरू झालं आहे. पहिल्याच दिवशी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं. त्यातही एका शहराने बाजी मारली आहे. 24 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनाही लसीकरणाच्या बाबतीच या शहराने मागे टाकलं आहे. इंदूर (Indore corona vaccination) हे देशातील सर्वात स्वच्छ शहर (clean city) आहे. या शहरानं देशातील सर्वात स्वच्छ शहराचा सलग चार वेळा मान मिळवला आहे. हे सर्व इंदूरवासियांमुळेच शक्य झालं आहे. आतापर्यंत स्वच्छतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या इंदूरनं लसीकरणातही (vaccination) बाजी मारली आहे. सोमवारी लसीकरण महाअभियानात हे शहर देशातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अव्वल राहिलं. एवढंच नव्हे तर देशातील तब्बल 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपेक्षाही इंदूरमध्ये लसीकरण जास्त झालं. दैनिक भास्कर च्या रिपोर्टनुसार, सोमवारी शहरात 2 लाख नागरिकांना कोविड प्रतिबंधक लशीचा डोस देण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. केवळ 11 तासांत आरोग्य कर्मचाऱ्यांनी हे लक्ष्य पूर्ण केलं. रात्री उशिरा हाती आलेल्या आकडेवारीनुसार इंदूर शहरात तब्बल 2 लाख 21 हजार 659 जणांचं लसीकरण करण्यात आलं होतं. शहरात 665 केंद्रांवर लसीकरण पार पडलं. केवळ इंदूर शहरातच नाही तर मध्य प्रदेश राज्यात एका दिवसांत सर्वात जास्त 16 लाख 41 हजार 42 जणांचं लसीकरण झालं. तर मध्य प्रदेशनंतर कर्नाटक (Karnataka) 11 लाख 517 जणांच्या लसीकरणासह दुसऱ्या क्रमांकावर राहिलं. सर्वात कमी लसीकरण अंदमान–निकोबारमध्ये झालं. इथे केवळ 783 लोकांना लस दिली गेली. हे वाचा - जुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS! विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा लसीकरणात इंदूरने जिल्हा स्तरावर देशात पहिला क्रमांक पटकावला. तर मध्य प्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर राहिलं. मध्य प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्येच 10 लाखांपेक्षा जास्त लसीकरण झालं. याशिवाय आसाम, बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांपेक्षा एका दिवसांत इंदूरमध्ये जास्त लसीकरण झालं. काही अशी राज्ये देखील आहेत, ज्यांच्या आतापर्यंतच्या लसीकरणाइतकं लसीकरण इंदूरमध्ये एका दिवसांत झालं. मध्य प्रदेशमधील लसीकरणाची स्थिती राज्यात आतापर्यंत 1 कोटी 67 लाख 50 हजार 995 जणांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी 1 कोटी 46 लाख 11 हजार 510 जणांना पहिला आणि 21 लाख 39 हजार 485 नागरिकांना दुसरा डोस दिला गेला आहे. इंदूरमधील लसीकरण शहरात आतापर्यंत एकूण 20 लाख 30 हजार 668 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय. त्यापैकी 17 लाख 60 हजार 608 जणांना पहिला आणि 2 लाख 70 हजार 260 जणांना दोन्ही डोस दिले गेले आहेत. हे वाचा - लस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामी?कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत खुलासा जिल्ह्याचे लसीकरण अधिकारी डॉ. प्रवीण जडिया यांनी सांगितलं, की ही आकडेवारी देशातील कोणत्याही जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. याआधी आंध्र प्रदेश आणि राजस्थानच्या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक लसीकरण झालं होतं. मात्र, कोणत्याच जिल्ह्यात एका दिवसात 2 लाख नागरिकांचं लसीकरण झालं नव्हतं. यासह शहरात आतापर्यंत 19 लाख 82 हजार 174 नागरिकांना कोरोनाची लस दिली गेली आहे. त्यापैकी 16 लाख 55 हजार 392 नागरिकांना लसीचा पहिला डोस आणि 2 लाख 63 हजार 618 नागरिकांना लसीचा दुसरा डोस दिला गेला आहे. सोमपासून सुरू झालेल्या लसीकरण महाअभियानाअंतर्गत सात दिवसांत 8 लाख नागरिकांना लस देण्यास उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.