लस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामी? कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा

लस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामी? कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा

डेल्टा प्लस व्हेरिएंट घातक समजला जात आहे. कारण लशीमुळे तयार झालेल्या अँटीबॉडीज आणि नैसर्गिक संसर्गामुळे तयार झालेली प्रतिकारशक्ती या दोन्ही गोष्टी निष्प्रभ ठरवण्याची क्षमता या डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जून: देशात गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणू संसर्गग्रस्तांचे आकडे घटत चालले आहेत. त्यामुळे दिलासादायक वातावरण तयार होत आहे. तसंच लसीकरणाचा वेगही हळूहळू वाढतो आहे. सध्या ओसरत असलेल्या दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटने (Delta Variant) धुमाकूळ घातला होता. B.1.617.2 हे त्याचं शास्त्रीय नाव, पण त्यात सातत्याने म्युटेशन होत असून, ते मोठ्या चिंतेचं कारण आहे. कारण अशा म्युटेशनद्वारे तयार झालेल्या कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटने आता अधिक रौद्र रूप धारण केलं असून, त्याला डेल्टा प्लस (Delta Plus) असं संबोधलं जात आहे. हा व्हेरिएंट घातक समजला जात आहे. कारण लशीमुळे तयार झालेल्या अँटीबॉडीज (Antibodies) आणि नैसर्गिक संसर्गामुळे तयार झालेली प्रतिकारशक्ती (Immunity) या दोन्ही गोष्टी निष्प्रभ ठरवण्याची क्षमता या डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना विषाणूच्या जनुकीय संशोधनासाठी इंडियन सार्स सीओव्ही टू जिनॉमिक कन्सॉर्शियमची (Indian SARS-CoV-2 Genomic Consortium - INSACOG) स्थापना करण्यात आली आहे. या 'इन्साकोग'चे माजी सदस्य आणि भारतातले प्रमुख विषाणूतज्ज्ञ प्रा. शाहीद जमील (Pro. Shahid Jameel) यांनी कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटबद्दल माहिती दिली. डेल्टा प्लस (Delta Plus Variant) या व्हेरिएंटमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे सगळे गुणधर्म आहेत, शिवाय त्यात दक्षिण आफ्रिकेतल्या बीटा व्हेरिएंटचं K417N नावाचं म्युटेशनही आढळत असल्यामुळे त्याचे गुणधर्मही त्यात दिसतात. त्यामुळे डेल्टा व्हेरिएंटसह बीटा व्हेरिएंटमुळे दिसणारी लक्षणं डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाल्यावर दिसतात.

चिंताजनक! महाराष्ट्रावर आता Delta Plus कोरोनाचं संकट; 6 जिल्ह्यांत सापडले रुग्ण

बीटा व्हेरिएंटवर लशीचा प्रभाव कमी आहे. अभ्यासातून असं आढळलं आहे, की डेल्टा आणि अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत बीटा व्हेरिएंटवर लस फारशी प्रभावी ठरत नाही. म्हणूनच दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या लशी परत पाठवल्या होत्या. कारण त्या लशी आफ्रिकेतल्या बीटा व्हेरिएंटवर प्रभावी नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं. बीटा व्हेरिएंटचे हे गुणधर्म डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये असल्याने तो व्हेरिएंटही लशीला फार दाद देत नाही. तसंच, नैसर्गिक प्रतिकारशक्तीही त्याच्यावर फार प्रभावी ठरत नसल्याचे संकेत मिळाले आहेत.

दरम्यान, डेल्टा प्लस व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य असल्याबद्दलचे पुरावे अद्याप मिळालेले नसल्याचंही प्रा. जमील यांनी सांगितलं. कोणत्या व्हेरिएंटचा प्रसार जास्त झाला आहे, हे जीनोम सिक्वेन्सिंगवरून कळतं. 25 हजार जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये केवळ 20 सिक्वेन्सेस डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आहेत. त्यामुळे अजूनही या व्हेरिएंटच्या प्रसाराबद्दल काळजी बाळगण्याचं फारसं कारण नसल्याचं प्रा. जमील म्हणतात. अजून मोठ्या प्रमाणात जीनोम सिक्वेन्सिंग केल्यानंतरच डेल्टा प्लसचा धोका किती आहे, हे कळू शकेल.

(वाचा - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्णसंख्या, मृतांच्या आकड्यात लक्षणीय घट)

कोरोनावर (Coronavirus) आपत्कालीन उपचारांकरता मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेल थेरपीला (Monoclonal Antibodies Cocktail Therapy) भारतात अलीकडेच मंजुरी देण्यात आली होती. अमेरिका आणि युरोपीय महासंघात आपत्कालीन वापरासाठी दिलेल्या परवानगीच्या आधारे भारतातही सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड्स ट्रोल ऑर्गनायझेशनने (CDSCO) या थेरपीच्या वापराला मे महिन्याच्या सुरुवातीला मंजुरी दिली होती, मात्र K417N हे म्युटेशन असलेला डेल्टा प्लस व्हेरिएंट अँटीबॉडीज कॉकटेलला दाद देत नाही, असं आढळलं आहे. हे चिंतेचं कारण असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कॅसिरिव्हिमॅब (Casirivimab) आणि इम्डेव्हिमॅब (Imdevimab) यांच्यापासून सिप्ला (Cipla) आणि रोश इंडिया (Roche India) या औषध कंपन्यांनी मोनोक्लोनल अँटीबॉडीजची निर्मिती केली आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: June 22, 2021, 12:25 PM IST

ताज्या बातम्या