भोपाळ, 7 ऑक्टोबर : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या गाडीवर अचानक आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. या घटनेचा VIDEO समोर आला आहे. मध्य प्रदेशात पोटनिवणुकांचे वारे वाहात आहेत. त्यासाठी एका प्रचारसभेत सहभागी होऊन कमलनाथ परत निघाले होते. भाजप कार्यालयाजवळ आल्यानंतर दगडफेक झाली.
युवा मोर्चाचे काही कार्यकर्ते कमलनाथ यांच्या मार्गावर आंदोलन करत होते. हातात काळे झेंडे घेऊन घोषणा देत होते. पण अचानक या मोर्चामधून काही दगड फेकले गेले. कमलनाथ यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली.
काँग्रेस नेते कमलनाथ अनुपपूर इथे प्रचार सभेसाठी निघाले होते. कार्यकर्त्यांची एक बैठक संपवून ते रॅलीच्या ठिकाणी जात असताना वाटेतच ही घटना घडली. भाजप कार्यकर्त्यांनीच दगडफेक केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. कमलनाथ यांच्या विरोधात ते घोषणा देत होते कमलनाथ यांची गाडी जवळ येताच ते आक्रमक झाले. हातात काळे झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी करत असतानाच ही दगडफेक झाली.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांच्या गाडीवर आंदोलकांनी दगडफेक केली. भाजप कार्यालयाजवळ गाडी आल्यानंतर दगड फेकले गेले. अनूपपूर इथली रॅली उरकून कमलनाथ निघाले असताना त्यांच्या गाडीवर हल्ला झाला.#MadhyaPradesh pic.twitter.com/P0KjazTFVY
— News18Lokmat (@News18lokmat) October 7, 2020
कमलनाथ यांना किंवा त्यांच्या ताफ्यातील कोणाला मोठी दुखापत किंवा इजा झालेली नाही. पण या घटनेमुळे मध्य प्रदेशात आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस हा संघर्ष आता टिपेला पोहोचला आहे. पोटनिवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटण्याची चिन्हं आहेत.
दरम्यान कमलनाथ यांच्यावर आणखी एक प्रकरण शेकण्याची चिन्हं आहेत. त्यांच्याविरोधात काल FIR दाखल करण्यात आली आहे.
कमलनाथ यांच्याविरोधात FIR
कमलनाथ हे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ धडाक्यात सभा घेत आहेत. प्रचार रॅलीत Covid-19 संदर्भातले सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाहीत म्हणून त्यांच्यासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आपत्तीव्यवस्थापन कायद्या अंतर्गत कमलनाथांवर कारवाई करण्यात येणार आहे.
प्रचार सभेत Covid protocol पाळले नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. Coronavirus चा धोका कायम असल्याने जास्तीत जास्त 100 लोकांच्या उपस्थितीतच राजकीय प्रचार सभा घेण्याचं बंधन आहे. पण स्थानिक उपविभागीय दंडाधिकाऱ्याने नोंदवलेल्या FIR नुसार कमलनाथ यांनी घेतलेल्या सभेला 2000 ते 25000 लोक उपस्थित होते. कोविड सुरक्षा नियमांचं त्यांनी उघडपणे उल्लंघन केल्यामुळे न्यायदंडाधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवला आहे.
मध्य प्रदेश विधानसभेच्या 28 जागांसाठी येत्या 3 नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत. या पोटनिवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kamal nath, Madhya pradesh