भोपाळ, 11 फेब्रुवारी : लग्नात (Marriage) बांधलेल्या गाठी सात जन्म तुटत नाहीत असा अनेकांचा विश्वास आहे. बदलत्या काळात अगदी सात जन्म राहिलं, पण किमान एक जन्म तरी एक लग्न टिकावं म्हणून अनेक जोडपी प्रयत्न करतात. मात्र काही जण या गोष्टीला देखील अपवाद असतात. त्यांना एखादं क्षुल्लक कारण देखील घटस्फोट मागण्यासाठी पुरेसं असतं.
मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमधील (Bhopal) कौटुंबिक न्यायालयात (Family Court) असंच एक अजब प्रकरण समोर आलं आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर विवाह समुपदेशन (Marriage Counselling ) करणारी मंडळी देखील चक्रावली आहेत. कारण, नवरा आपल्याला ऑस्ट्रेलियातील विद्यापीठात अॅडमिशन मिळवून देऊ शकला नाही, म्हणून बायकोनं घटस्फोटासाठी (Divorce) अर्ज केला आहे.
पूर्ण प्रयत्न केला पण...
या विवाह समुपदेशकानं टीव्ही चॅनलशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. “तक्रारदार महिलेच्या नवऱ्यानं आपल्या बायकोला ऑस्ट्रेलियन विद्यापीठात प्रवेश मिळावा म्हणून खूप प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. त्यांच्यापुढे अन्य देशांमधील विद्यापीठात प्रवेश घेण्याचा देखील पर्याय होता. मात्र ऑस्ट्रेलियातच शिकण्याचा त्याच्या पत्नीचा हट्ट कायम होता.
आपला नवरा ही इच्छा पूर्ण करत नाही त्यामुळे ती इतकी चिडली की तिने थेट घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. त्याचबरोबर ती गेल्या एक वर्षांपासून नवऱ्यासोबत राहत देखील नाही. विशेष म्हणजे या जोडप्याला दोन मुलं आहेत. त्यामुळे आता आपलं कुटुंब कसं वाचवायचं याची काळजी तिच्या नवऱ्याला सतावत आहे.
आता विद्यापीठात प्रवेश न मिळाल्यानं नाराज झालेल्या पत्नीची समजूत कशी काढायची? त्यांचा संसार कसा वाचवायचा? हा प्रश्न कौटुंबिक न्यायालयाला पडला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Court, Madhya pradesh, Marriage