नवी दिल्ली 7 मार्च : काँग्रेसने लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. ही यादी 11 जणांची असून त्यात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचा समावेश आहे. यात उत्तर प्रदेशातून 11 आणि गुजरातमधून 4 जणांचा समावेश आहे. निवडणुकांच्या तारखांची अजुन घोषणाही झालेली नसताना काँग्रेसने पहिली यादी जाहीर करून बाजी मारली आहे. रायबरेलीमधून सोनिया गांधी, अमेठीमधून राहुल गांधी हे काँग्रेसचे उमेदवार असतील. प्रियांका गांधी यांना रायबरेली मधून उमेदवारी देणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र पहिल्या यादीत त्यांचं नाव नाही. तारखांची होणार लवकरच घोषणा देशातलं राजकीय वातावरण तापलं आहे. प्रचार सभांची सुरूवातही झाली आहे. असं वातावरण असताना निवडणुकांच्या तारखांची घोषणा केव्हा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणं अपेक्षीत होतं. मात्र भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या तणावामुळे त्यात थोडा उशीर होण्याची शक्यता शक्यता आहे. आता 7 ते 10 मार्चच्या दरम्यान निवडणूक आयोगाकडून या तारखा घोषीत होण्याची शक्यता आहे. निवडणुक आयोगाने अनेक राज्यांमध्ये जाऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला आहे. आयोगाची गेले काही महिने जोरदार तयारी सुरू होती. त्यामुळे या तारखांची आता केव्हाही घोषणा होऊ शकते. ही शक्यता लक्षात घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमांच्या उद्घाटनांचा आणि भूमिपूजनांचा धडाका लावला आहे. तर तारखा जाहीर होण्यास उशीर होत असल्याने काँग्रेससहीत काही राजकीय पक्षांनी आयोगावर टीकाही केली होती. पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभा होईपर्यंत आयोग वाट पाहत आहे का? अशी टीका काँग्रेसने केली होती. 2018 मध्ये झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषीत करण्यावरूनही वाद झाला होता. लोकसभेच्या निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम, अरूणाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या निवडणुका घेण्याचाही सरकार विचार करत आहे. 2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुका 7 एप्रिल ते 12 मे च्या दरम्यान 9 टप्प्यांमध्ये झाल्या होत्या. तर 16 मे रोजी निवडणुकांचे निकाल घोषीत झाले होते. त्यात भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 ला शपथ घेतली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकांची अधिसूचना 5 मे रोजी जाहीर झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.