गोरखपूर, 21 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या काळात मजुरांना, हातावर पोट असलेल्या लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. आता उत्तर प्रदेशातल्या एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये दिल्लीमध्ये एका मजूराचा मृत्यू झाल्यनंतर मृत्याच्या कुटुंबाने मृतदेहाऐवजी वाळलेल्या गवताचा प्रतिकात्मक पुतळा करून त्यावर अंत्यसंस्कार केले. लॉकडाऊनच्या परिस्थितीत मृतदेह गावी आणण्यासाठी त्यांच्याकडे पैसै नसल्यानं अशा पद्धतीनं अंत्यसंस्कार करावे लागले.
गोरखपूर जिल्ह्यातील सुनिल नावाची व्यक्ती दिल्लीत काम करत होती. तिथं चिकन पॉक्समुळे सुनिलचा मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही आणि घरचं अठरा विश्व दारिद्र्य अशा परिस्थितीत सुनिलचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह गावी आणण्याची कोणतीच व्यवस्था करणं कुटुंबियांना शक्य नव्हतं. त्यामुळे कुटुंबाने सुनिलचा गवताचा प्रतिकात्मक पुतळा केला आणि त्यावर अंत्यसंस्कार केले.
सुनिल जानेवारी महिन्यात दिल्लीला गेला होता. तिथं एका टायर रिपेअरिंग करणाऱ्या दुकानात तो कामाला होता. 11 एप्रिलला आजारी पडल्यानंतर सुनिलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं 14 एप्रिलला सुनिलचा मृत्यू झाला. सुनिलची कोरोना टेस्टही करण्यात आली होती. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. सुनिलच्या मृत्यूची माहिती कुटुंबियांना देण्यात आली. तेव्हा मृतदेह गावी नेण्याबाबत विचारलं असता पत्नीने इकडे आम्ही प्रयत्न केले पण काहीच मिळाले नाही असं सांगत असमर्थता दर्शवली. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या सरपंचांकडून दिल्ली पोलिसांना फोन करून तुम्हीच अंत्यसंस्कार करा अशी विनंतही सुनिलच्या घरच्या लोकांनी केली.
हे वाचा : 8000 हून जास्त कोरोनाचे रुग्ण असलेल्या या देशाने 1 जूनपर्यंत वाढवला लॉकडाऊन
याबाबत पोलिसांनी सांगितलं की, सुनिलची पत्नी पुनमने ती दिल्लीला येऊ शकत नाही असं सांगितलं. ट्रेन बंद आहेत आणि कार घेऊन येण्याऐवढे पैसे नाहीत. घरी लहान मुलं आहेत, लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणही मोठी आहे. त्यामुळे दिल्लीला मृतदेह आणण्यासाठी येणं शक्य नाही. दरम्यान, सुनिलच्या पत्नीकडून कन्सेंट फॉर्मवर सही करण्यात आली असून तो फॉर्म दिल्ली पोलिसांना मिळाल्यानंतर सुनिलच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातील.
हे वाचा : डब्बेवाले, उद्योजक आणि कलाकारांचं कोरोनावर नवं गाणं, पाहा VIDEO
संपादन - सूरज यादव
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus