परदेशात करियर करून तिथेच संसार थाटण्यात इतर राज्यांच्या तुलनेत पंजाबच्या तरुणांची संख्या अधिक असते. तेथील असंख्य तरुणमंडळी आज विविध देशांमध्ये सुखी आयुष्य जगत आहेत. अशातच अमनदीप यांच्यासारख्या तरुणांची भारतीय मातीची ओढ थक्क करणारी ठरते.
चांगल्या पगाराची नोकरी करण्यासाठी अमनदीप यांनी 3 वर्षांपूर्वी कुवेतची वाट धरली होती. तिथे त्यांना ड्रायव्हर म्हणून चांगलं कामही मिळालं होतं. मात्र आपलं कुटुंब आणि देशाच्या ओढीने ते पुन्हा भारतात आले.
महत्त्वाचं म्हणजे अमनदीप हे कुवेतहून कॅनडाला जाणार होते. तिथे आणखी चांगली नोकरी मिळविण्यासाठी त्यांना प्रयत्न करायचे होते. मात्र आपल्या एका वर्षाच्या मुलीसाठी 2022 साली ते कुवेतहून थेट भारतात आले.
अमनदीप म्हणतात, ‘मी परदेशात लाखो रुपये कमवले. मात्र माझ्या मुलीसाठी मी माझं अख्खं आयुष्यही द्यायला तयार आहे. तिला जवळून मोठं होताना पाहण्यासाठी, तिचे लाड करण्यासाठी मी घरी परतलो.’ विशेष म्हणजे अमनदीप आणि त्यांची पत्नी आता रस्त्याशेजारी कुलछे विकतात. त्यांच्या या व्यवसायाला ग्राहकांनाच चांगला प्रतिसाद मिळतोय.
‘आपण परदेशात जाऊन उत्तम पगाराची नोकरी करून भरपूर पैसे कमवू शकतो. मात्र आपले सर्व नातेवाईक तिकडे येऊ शकत नाहीत. आपली सगळी नाती इकडेच राहून जातात. त्यामुळे मी पंजाबच्या इतर तरुणांनाही सांगू इच्छितो, इथेच मेहनत करून आपण पंजाबचं भविष्य उज्ज्वल करण्यावर भर देऊया’, असं अमनदीप म्हणाले.