पुणे, 14 एप्रिल : भारतातला मोसमी पाऊस अर्थात नैर्ऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे (SW Monsoon) होणारा पाऊस अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅसिफिक महासागराच्या विषुववृत्तीय प्रदेशात ला निना (La Nina) किंवा एल निनो (El Nino) या घटना घडणं. सध्या ला निना ही घटना सुरू असून, ती आता दुर्बळ स्थितीत (Weak Phase) असली तरी आगामी काही महिने कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मान्सूनच्या (Summer Monsoon Forecast) निदान सुरुवातीच्या टप्प्यासाठी तरी हे चांगलं लक्षण ठरू शकतं, असं भारतीय हवामान खात्याने म्हटलं आहे. त्यामुळे यंदा मान्सूनची सुरुवात चांगली होण्याची आशा वाढली आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. IMD अर्थात भारतीय हवामान खात्याने (India Meteorolgical Department) एप्रिल महिन्यासाठीचं एल निनो सदर्न ऑसिलेशन बुलेटिन (ENSO) नुकतंच प्रसिद्ध केलं. त्यात ला निनाबद्दलचा हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हाय रिझॉल्युशन मान्सून मिशन कपल्ड फोरकास्ट सिस्टीम मॉडेलद्वारे (MMCFS) मार्चमधल्या प्राथमिक परिस्थितीच्या माहितीच्या आधारे हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनसाठीचा पहिल्या टप्प्यातला लाँग रेंज फोरकास्ट (Longe Range Forecast) अर्थात दीर्घकालीन प्राथमिक अंदाज भारतीय हवामान खातं आज (14 एप्रिल) जाहीर करणार आहे. तत्पूर्वी एल निनो आणि ला निनाबद्दलचा अंदाज जाहीर करण्यात आला. लिंबानंतर आता Tomato सुद्धा होऊ शकतो महाग, हे आहे मोठं कारण पॅसिफिक महासागराच्या विषुववृत्तीय प्रदेशात सागराच्या पृष्ठभागाचं तापमान वाढल्यास जो प्रवाह तयार होतो, त्याला एल निनो असं म्हणतात. पृष्ठभागाचं तापमान कमी झाल्यास जो प्रवाह तयार होतो, त्याला ला निना असं म्हणतात. या दोन्ही घटना जगभरातले मान्सून आणि तापमान यांच्यावर बरेच परिणाम करतात. एल निनो प्रवाह असल्यास भारतात मान्सूनच्या आगमनावर आणि प्रमाणावर दुष्परिणाम होतो. एप्रिलच्या ENSO बुलेटिनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हिंदी महासागराचा (Indian Ocean) उत्तर भाग, अरबी समुद्राचा (Arabian Sea) उत्तर भाग आणि बंगालचा उपसागर (Bay of Bengal) यांचं तापमान उष्णच आहे. या उष्णतेमुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होते; पण या वेळी ती झाली नाही. कारण मार्च महिन्यातली परिस्थिती पाहता हिंदी महासागराचा उत्तर भाग चक्रीवादळाची निर्मिती होऊ शकेल एवढ्या प्रमाणात उष्ण झाला नव्हता. ज्याप्रमाणे पॅसिफिक महासागरात (Pacific Ocean) ENSO आहे, त्याचप्रमाणे हिंदी महासागरात IOD अर्थात इंडियन ओशन डायपोलची भूमिका महत्त्वाची असते. आगामी महिन्यांत IOD नकारात्मक अर्थात Negative असेल, असं IMD चं म्हणणं आहे. ‘सध्या हिंदी महासागरात IOD न्यूट्रल आहे. एप्रिल ते जून या कालावधीत निगेटिव्ह IOD विकसित होण्याची शक्यता आहे,’ असं IMD ने म्हटलं आहे. निगेटिव्ह IOD ही स्थिती मान्सूनसाठी प्रतिकूल असल्याचं मानलं जातं. ‘एप्रिल महिन्यात हिंदी महासागराच्या बहुतांश भागांत सागरी पृष्ठभागाचं तापमान नॉर्मल असण्याची शक्यता आहे; मात्र आगामी दोन हंगामांमध्ये हिंदी महासागराच्या पूर्व भागापेक्षा पश्चिम भाग काही अंशी जास्त थंड राहण्याची शक्यता आहे,’ असंही IMD ने आपल्या अंदाजात म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.