तिरुवनंतपुरम, 18 मे : केरळमध्ये कोविड-19 चे (Corona in Kerala) संकट चांगल्या प्रकारे हाताळल्याबद्दल कौतुक झालेल्या माजी आरोग्यमंत्री के. के. शैलजा (Health Minister K. K. Shailaja) यांना राज्याच्या नवीन मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नवीन मंत्रिमंडळात माकप आणि भाकपच्या नव्या तरुण नेत्यांना संधी मिळाली आहे. यात केवळ मुख्यमंत्री पिनारयी विजयन हा एकमेव जुना चेहरा पाहायला मिळत आहे.
राज्यात कोविड-19 महासाथीच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रसार रोखण्याचं काम उत्कृष्टरित्या करणाऱ्या शैलजा निवृत्त शिक्षकदेखील आहेत. यापूर्वी त्यांनी राज्यात 2018 आणि 2019 मध्ये फैलावलेल्या निपाह (Nipah) विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी चांगलं काम केलं होतं. यानंतर कोरोना महासाथीला आळा घालण्यासाठीही त्यांनी ट्रॅकिंग, विलगीकरण आणि रोगप्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी केलेल्या कामाचंही कौतुक झालं होतं.
कोविडच्या संकटाने पुन्हा एकदा विळखा घातलेला असताना अत्यंत महत्त्वाच्या वेळी आरोग्यमंत्री बदलण्याच्या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शैलजा यांना मंत्रिमंडळातून वगळल्याबद्दल कित्येकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. एलडीएफच्या ऐतिहासिक विजयात त्यांची भूमिका मोठी होती, असं अनेकांनी म्हटलं आहे.
यावर स्पष्टीकरण देताना नवीन टीम तयार करणं हा आपल्या धोरणाचा भाग असल्याचं सांगताना केवळ विजयन यांना सवलत देण्यात आल्याचे सीपीआयएमने म्हटले आहे.
राजकीय विश्लेषक जे प्रभाष म्हणाले की, मंत्रिमंडळात सातत्य आणि बदलाचे मिश्रण असायला हवं होतं. त्या दृष्टीने ज्यांनी मोठा बदल घडवून आणला, अशा शैलजा यांचा मंत्रिमंडळात समावेश करणे चांगले ठरले असते.’
केरळमधील दुसरे पिनारायी विजयन सरकार 20 मे रोजी शपथ घेणार असून 21 सदस्यीय मंत्रिमंडळ असेल, असं एलडीएफचे संयोजक आणि माकपचे राज्याचे कार्यवाहक सचिव ए. विजयराघवन यांनी सोमवारी सांगितलं. डाव्या लोकशाही आघाडीच्या राज्य समितीच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर ते म्हणाले की, नवीन डाव्या सरकारचा शपथविधीसाठी कोविड-19ची परिस्थिती पाहता मर्यादित आमंत्रित लोकच उपस्थित असतील.मंत्र्यांचे कार्यक्षेत्र मुख्यमंत्रीच ठरवतील असेही ते म्हणाले.
‘विधानसभा निवडणुकीत एलडीएफला प्रत्येक घटकाचा प्रचंड पाठिंबा मिळाला आहे. आम्हाला असं सरकार स्थापन करायचं आहे, जे प्रत्येकाच्या अपेक्षांना पूर्ण करू शकणारं आणि सर्व घटकांचे प्रतिनिधीत्व करणारं असेल,’ असं विजयराघवन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
नव्या मंत्रिमंडळात एलडीएफ युतीमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाकपचे 12 सदस्य असतील. तर, दुसर्या क्रमांकाच्या माकपचे 4 आणि केरळ काँग्रेस (जनता), जनता दल (एस) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी असेल, असे ते म्हणाले.
हे वाचा - कोंबडीला न मारताच होणार चिकन निर्मिती; ‘या’ ठिकाणी विक्रीला मिळाली परवानगी
एमव्ही गोविंदन, के. राधाकृष्णन, के. एन. बालागोपाल, पी. राजीव, व्ही. एन. वसावन, साजी चेरियन, व्ही. शिवनकुट्टी, मोहम्मद रियास, डॉ. बिंधू, वीणा जॉर्ज आणि व्ही अब्दुल रहमान हे सीपीआयएमचे मंत्री असतील. विधानसभा अध्यक्षपदासाठी एम. बी. राजेश यांना संधी मिळाली आहे. मागील मंत्रिमंडळात मंत्री असलेले टी. पी. रामकृष्णन संसदीय सचिव असतील.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) आणि भाजप-एनडीए यांना पराभूत करून एलडीएफने केरळमध्ये 99 जागा जिंकून सत्ता कायम राखली आहे. यूडीएफ केवळ 41 जागा जिंकू शकला आहे. भाजपला मात्र एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kerala, Kerala Election, Woman in politics