मुंबई, 15 डिसेंबर : सुमारे 2 दशकांपूर्वी भारतात दळणवळण क्रांती झाली. आज तर 5जी कनेक्टिव्हिटीचं युग सुरू झालं आहे; पण देशात आजही एक असं गाव आहे, जिथे माहिती आणि दळणवळण क्रांती ही खूप दूरची गोष्ट आहे. या ठिकाणच्या रहिवाशांसाठी रेडिओ हे बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्याचं एकमेव साधन आहे. हा रेडिओसुद्धा गावामध्ये 7 वर्षांपूर्वी आलाय. 2015मध्ये उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यातल्या दुर्गम खिरदवारी गावात राहणारी आदिम वन रावत जमातीची एक 65 वर्षीय व्यक्ती गावापासून जवळ असणाऱ्या चल्थी बाजारपेठेत 18 किलोमीटर चालत गेली आणि त्याने तिथून रेडिओ ट्रान्झिस्टर खरेदी केला. संपर्काचं एकमेव माध्यम हा रेडिओ गावात आल्यामुळे गाव जगाच्या जवळ येण्यास मदत झाली. अनेक वर्षांनंतर खिरदवारी गावात राहणाऱ्या वन रावत जमातीच्या जवळपास 200 सदस्यांसाठी हाच रेडिओ ट्रान्झिस्टर बाह्य जगाशी संवाद साधण्याचं एकमेव साधन झालं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गावातले 80 वर्षांचे रघुवीर सिंग म्हणाले, ‘ज्या दिवशी हा रेडिओ मिळाला, तो दिवस माझ्यासाठी आणि गावासाठी एक महत्त्वाचा प्रसंग होता. मी फार शिकलेला नसलो, तरी मला चालू घडामोडींची माहिती घेण्यास आवडतं.’ 30 वर्षीय मुलीने चक्क देवासोबत बांधली लग्नगाठ! कारण आहे विशेष रोज होते गर्दी रघुवीर सिंग पुढे म्हणाले, ‘त्या दिवशी मी रेडिओवर लोकल स्टेशन लावलं, तेव्हा नागरिकांमध्ये उत्साहाची लाट उसळली. आता रोजचं बुलेटिन ऐकण्यासाठी गावातले नागरिक एका ठिकाणी जमू लागलेत. तेव्हापासून प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातम्या ऐकण्यासाठी माझं घर हे गावकऱ्यांसाठी एक आवडता अड्डा बनला आहे.’ समाजापासून अद्यापही दूर असणारं खिरदवारी गाव जवळच्या रस्त्यापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे; पण आजही या गावात वीज नाही, सार्वजनिक वितरण दुकानं किंवा आरोग्य सेवा सुविधा नाहीत. गावातले नागरिक आजूबाजूच्या गावात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, गावातले एक नागरिक जीत सिंग म्हणाले, ‘सरकार तंत्रज्ञान-आधारित विकास आणि डिजिटल क्रांतीबद्दल बोलत असताना, आमच्याकडे फोन कनेक्शनही नाही, इंटरनेट कनेक्टिव्हिटी तर खूप दूरची गोष्ट आहे. तसंच, आमच्या गावात वीजपुरवठाही नाही. आम्ही आमच्या घरात प्रकाशासाठी तेलाचे दिवे लावतो.’ जंगली कुत्र्यापासून आपल्या बाळाला वाचवणाऱ्या आईचा Video Viral दुसरीकडे टनकपूरचे सरकारी अधिकारी हिमांशू कफल्टिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जिल्हा प्रशासनाने गावात बीएसएनएलचे टॉवर बसवण्यासाठी, तसंच गावात वीजपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. एकीकडे 5जी तंत्रज्ञान सुरू झाले असताना, आजही देशातल्या या गावात फोन आणि वीजपुरवठा नसल्यामुळे हे गाव चर्चेत आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.