तिरुवनंतपूरम, 31 मे : केरळ हाय कोर्टाने (Keral High Court) मंगळवारी समलैंगिक नात्याबाबत मोठा निर्णय सुनावला आहे. न्यायालयाने आदिलाद्वारा दाखल केलेल्या हॅबियस कॉर्पस याचिकावर निर्णय सुनावला. कोर्टाने समलैंगिक प्रेमी जोडपं आदिला नसरीन (22 वर्षे) आणि फातिमा नूरा (23 वर्षे) यांना एकत्र राहण्याची परवानगी दिली आहे.
जोडप्याला कुटुंबीयांनी जबरदस्तीने केलं वेगळं… या जोडप्याला कुटुंबीयांनी जबरदस्तीने वेगळे केलं होतं. आणि फातिमा नूराला कथितरित्य धर्मांतरणासाठी दबाव आणला होता. आदिला नसरीन यांनी केरळ उच्च न्यायालयासमोर हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होता. त्यानंतर फातिमा नूराला बिनानीपुरम पोलिसांनी न्यायालयात हजर केले. अल्पशा सुनावणीत न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन आणि सी. जयचंद्रन यांच्या खंडपीठाने समलिंगी जोडप्याशी थेट संवाद साधत त्यांना एकत्र राहायचे आहे का, अशी विचारणा केली. दोघांनी होय असे उत्तर दिले, त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला.
जीवे मारण्याची धमकी… आदिलाने फातिमा नूरासोबत आपल्या संबंधांबाबत एका माध्यमाशी बोलताना सविस्तरपणे सांगितलं. ती म्हणाली की, त्यांना एकत्र राहायचं आहे. मात्र यासाठी त्यांना बहिष्कृत करण्यात आलं. याशिवाय जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. तिच्या प्रेयसीच्या आईने तिच्या विरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. नसरीने सांगते की, आम्ही समलैंगिक जोडपं आहोत. शालेय वयातच आम्ही एकत्र आलो होतो. सुरुवातील आई-वडिलांनी आम्हाला पकडलं होतं. यानंतर आम्ही त्यांना खोटं सांगितलं आणि आमचं नातं पुढे कायम ठेवलं. पुढील शिक्षण घेण्यासाठी आम्ही घर सोडलं.