• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • लष्करी प्रशिक्षण अभ्यासक्रमात होणार भगवत गीतेचा समावेश? CDM ने केली शिफारस

लष्करी प्रशिक्षण अभ्यासक्रमात होणार भगवत गीतेचा समावेश? CDM ने केली शिफारस

प्राचीन भारतीय ग्रंथांमधल्या आताच्या काळाला सुसंगत अशा शिकवणींचा सध्याच्या लष्करी प्रशिक्षण (Military Training Curriculum) अभ्यासक्रमात समावेश करण्याचे मार्ग शोधावेत, अशी शिफारस 'कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट'ने (CDM) केलेल्या अंतर्गत अभ्यासानंतर करण्यात आली आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 03 सप्टेंबर: भगवत गीता हा जगण्याचं तत्त्वज्ञान सांगणारा प्राचीन भारतीय ग्रंथ आहे. आर्य चाणक्य अर्थात कौटिल्याचं अर्थशास्त्र देखील (Kautilya's Arthashastra) जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दल मार्गदर्शन करतं. या आणि अशा प्राचीन भारतीय ग्रंथांमधल्या आताच्या काळाला सुसंगत अशा शिकवणींचा सध्याच्या लष्करी प्रशिक्षण (Military Training Curriculum) अभ्यासक्रमात समावेश करण्याचे मार्ग शोधावेत, अशी शिफारस 'कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट'ने (CDM) केलेल्या अंतर्गत अभ्यासानंतर करण्यात आली आहे. इंडियन कल्चर स्टडी फोरम (Indian Culture Study Forum) अर्थात भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या फोरमची स्थापना करण्याची शिफारसही या अभ्यासाअंती करण्यात आली आहे. या शक्यतेवर सखोल संशोधन करण्यासाठी स्वतंत्र शाखा तयार करण्याबद्दलही सुचवण्यात आलं आहे. कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट (CDM) सिकंदराबादमध्ये असून, तिथे लष्कर, नौदल आणि हवाई दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना उच्च दर्जाच्या संरक्षण व्यवस्थापनासाठी (Defence Management) प्रशिक्षण दिलं जातं. 'प्राचीन भारतीय संस्कृती (Ancient Indian Culture) आणि युद्धतंत्रांची वैशिष्ट्यं आणि सध्याच्या काळातले धोरणात्मक विचार (Strategic Thinking) आणि प्रशिक्षणात त्याचा अंतर्भाव करणं' या विषयावरचा प्रकल्प हेडक्वार्टर इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफकडून प्रायोजित करण्यात आला होता. हे वाचा-कोरोनापासून वाचण्यासाठी सर्वात प्रभावी मास्क कुठला? शास्त्रज्ञांनी शोधलं उत्तर संरक्षण दलातील उच्चपदस्थ सूत्राने न्यूज 18ला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्य दलातले नेतृत्वगुण आणि धोरणात्मक विचारशैली या अनुषंगाने निवडक प्राचीन भारतीय साहित्याचा धांडोळा घेणं आणि त्यातले सध्याच्या काळाशी सुसंगत असे उत्तम विचार आणि कार्यपद्धती कशी स्वीकारता येईल, याबद्दल निश्चित आराखडा तयार करणं हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता. मिलिटरी डिप्लोमसी, मुत्सद्दीपणा आदींसंदर्भात प्राचीन भारतीय ग्रंथात असलेल्या ज्ञानाचा यात समावेश असू शकतो. भारतीय लष्कराचं भारतीयीकरण करण्याच्या उद्देशाने गेल्या काही महिन्यांत केंद्र सरकारने नव्याने जोर लावला आहे. मार्च महिन्यात गुजरातमध्ये केवडिया इथे झालेल्या कम्बाइन्ड कमांडर्स कॉन्फरन्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संरक्षण दलांमध्ये स्वदेशी धोरणाचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्याची गरज व्यक्त केली होती. लष्करी शस्त्रास्त्रांसोबतच लष्करात वापरले जाणारे संदर्भग्रंथ, तत्त्वज्ञान, विचार आणि पद्धती यांमध्येही स्वदेशी ज्ञानाचा अंतर्भाव करण्याबद्दलचे विचार त्यांनी मांडले होते. भारतीय सशस्त्र दलांमधल्या परंपरा आणि संस्कृतीच्या भारतीयीकरणाविषयी दोन सत्रंही त्या परिषदेत झाली होती. दी प्रिंटच्या वृत्तानुसार त्या परिषदेनंतर संरक्षण दलांमध्ये बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने काम सुरू झालं आहे. लष्कराच्या बँडमध्ये नव्या स्वदेशी धूनचा समावेश करणं, स्वातंत्र्यपूर्व काळात लढाईसाठी दिल्या जाणाऱ्या सन्मानांमध्ये बदल करणं, युद्धांतल्या भारतीय हीरोंच्या कामगिरीवर जास्त लक्ष केंद्रित करून त्यांचा आदर्श घेणं आणि धोरणात्मक अभ्यासासाठी प्राचीन भारतीय ग्रंथांचं साह्य घेणं आदींबद्दल काम सुरू आहे. हे वाचा-भारताच्या शेजारी देशात परिस्थिती बिकट, Food Emergency ची घोषणा मध्य प्रदेशातल्या महू इथल्या आर्मी वॉर कॉलेजने (Army War College) प्रसिद्ध केलेल्या कॉम्बॅट पेपरमध्ये महाभारत आणि अर्थशास्त्रातले दाखले देण्यात आले होते. प्राचीन भारतीय ग्रंथांमधले धोरणात्मक विचार आणि युद्धकलेबद्दलची माहिती आजच्या काळातही सुसंगत असल्याचा उल्लेख त्या पेपरमध्ये करण्यात आला होता. CDMने केलेल्या शिफारशी धोरणात्मक विचार, नेतृत्वगुण, मुत्सद्दीपणा, युद्धकौशल्य या आधुनिक काळातल्या संकल्पनांच्या अनुषंगाने कौटिल्याचं अर्थशास्त्र, श्रीमद्भगवद्गीता आणि थिरुक्कुरल या प्राचीन ग्रंथांवर CDM च्या अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. कौटिल्याचं अर्थशास्त्र म्हणजे सैन्यदलांसाठी खजिनाच आहे, असं या अभ्यासात म्हटलं आहे. सध्याच्या काळाशीही ते सुसंगत असून, युद्धभूमीवरच्या जवानासह लष्करी अधिकाऱ्यापर्यंत सर्वांना उपयुक्त ठरतील, असे धडे त्यात आहेत. नेतृत्वगुण, युद्धकला आणि धोरणात्मक विचार या अनुषंगाने सध्याच्या काळात हे तीन ग्रंथ सुसंगत आहेत, असा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे. इंडियन कल्चर स्टडी फोरमची स्थापना करण्याची शिफारस CDM ने केली आहे. अशा प्रकारची फोरम्स पाकिस्तान आणि चीनमध्ये अस्तित्वात आहेत. शिफारशीत असं म्हटलं आहे, की इंडियन कल्चर क्लबची (Indian Culture Club) स्थापना केली जावी. प्राचीन भारतीय ग्रंथांवरचं उपलब्ध संशोधन आणि ऑनलाइन उपलब्ध असलेलं संदर्भसाहित्य क्लबच्या माध्यमातून उपलब्ध करून देता येईल. तसंच, क्लबच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर पॅनेल डिस्कशन्स, गेस्ट लेक्चर्सही आयोजित करता येतील. प्राचीन भारतीय ग्रंथ, संस्कृती यांवर संशोधन करणारी विशेष शाखा CDMच्या कमांडंटच्या अध्यक्षतेखाली तयार केली जावी, अशी शिफारसही करण्यात आली आहे. मनुस्मृती, नीतिसार, महाभारत यांसारख्या प्राचीन ग्रंथांवर दोन वर्षं अभ्यास केला जावा. प्राचीन भारतीय संस्कृती आणि त्यातले लष्करासाठी उपयुक्त ठरतील असे धडे यांवर कार्यशाळा, तसंच वार्षिक सेमिनार्स आयोजित करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. CDM ही संस्था भारतीय संस्कृतीच्या अभ्यासामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून विकसित व्हावी, असं दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवलं जावं, असंही CDMच्या अभ्यास अहवालात म्हटलं आहे. संरक्षण दलांच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या प्राचीन ग्रंथांमधून आवश्यक ते धडे संरक्षण दलांना देण्यासाठी धर्मगुरूंनाही त्यात सहभागी करून घेण्याची सूचना या अभ्यासातून करण्यात आली आहे. संस्थात्मक आराखड्याच्या माध्यमातून प्राचीन भारतीय ग्रंथांचा लष्करी संस्थांच्या अभ्यासक्रमात समावेश करण्याची गरजही या अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे.

First published: