बंगळुरू 13 मे : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. दुपारपर्यंत राज्यातील भविष्यातील राजकीय चित्र स्पष्ट होईल, अशी आशा निवडणूक अधिकाऱ्यांना आहे. मात्र मतमोजणीदरम्यान कल हाती येण्यास सुरूवात झालेली आहे. यानुसार काँग्रेसने भाजपला मागे टाकत आघाडी घेतल्याचं चित्र आहे. यानंतर आता घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसने आधीच खबरदारी घेतली आहे. काँग्रेसने सर्व आमदारांना दाखले घेऊन बंगळुरूला येण्याच्या सूचना दिल्या आहेत. कर्नाटकातील तीन हवाई पट्टीवर काँग्रेसने छोटी विमाने तैनात केली होती. प्रत्येक पट्टीवर पक्षाच्या राज्यस्तरीय जबाबदार नेत्याची तैनाती करण्यात आली. त्या भागातील विजयी आमदारांना घेऊन एक विमान बेंगळुरूला येईल. तर फक्त जवळच्या आमदारांनाच रस्त्याने आणलं जाईल. Karnataka Election Results 2023 Live Updates : भाजप कोमात, काँग्रेस जोमात; मुख्यमंत्रिपदाचं नाव सुद्धा ठरलं! हेलिकॉप्टर आणि उड्डाणाची तयारी सुरू आहे. बेळगाव धारवाड हुबळी गुलबर्गा बिलारी येथे हेलिकॉप्टर आणि उड्डाणाची व्यवस्था करण्यात आली आहे. निकालानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत भाजपला कोणत्याही प्रकारे संधी मिळू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. प्रत्येक मिनिटाचा अहवाल घेतला जात आहे. प्रत्येक सीटचा मागोवा घेतला जात आहे. सर्व आमदारांना कनेक्टिंग पॉईंट्सवर पोहोचल्यानंतर बेंगळुरूला येण्यास सांगितलं आहे. प्रत्येक उमेदवारासोबत पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. विजेत्यांना विमानाने पोहोचण्याच्या आणि रस्त्याने बेंगळुरूला पोहोचेपर्यंत त्यांच्यासोबत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेसचा विजय झाल्यास मुख्यमंत्री कोण? असा सवालही काहींना होता, तर पूर्ण बहुमत मिळाल्यास केवळ सिद्धरामय्याच मुख्यमंत्री होतील, अशी माहिती काँग्रेस सूत्रांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.