लखनऊ, 3 जून : उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून (Kanpur) एक मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) कानपूर दौऱ्यावर आहेत. ते कानपूरमध्ये दाखल झाले आहेत. पण त्यांच्या दौऱ्याआधीच एक अनपेक्षित घटना समोर आली आहे. कानपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी मोठा राडा झाला आहे. दोन समाजात वादाची ठिणगी पडल्यानंतर हा राडा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. ते व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत. त्या व्हिडीओमध्ये दोन गट एकमेकांवर दगडफेक (Stone Pelting) करताना दिसत आहेत. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांच्या गावी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कानपूर दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी कानपूरमध्ये विविध कार्यक्रमांचं उद्घाटन करणार आहेत. विशेष म्हणजे मोदी दुपारी तीन ते साडे तीन वाजेच्या सुमारास कानपूरमध्ये दाखल देखील झाले आहेत. पण ते कार्यक्रमस्थळी जाण्याआधीच कानपूरमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली. दोन गटात हा राडा झाला.
Violence, massive stone pelting in UP's Kanpur. This happening on the day when top investors of the country are attending ground breaking ceremony in UP to explore investment opportunities. pic.twitter.com/fK0qu0lKPA
— Piyush Rai (@Benarasiyaa) June 3, 2022
दोन्ही बाजूने तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीत दहापेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. संबंधित परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कानपूरमध्ये आता तणावपूर्ण शांतता आहे. पण मोदींच्या दौऱ्याआधी शहरात मोठी दगडफेकीची घटना घडली. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. घटनेमागे नेमकं कारण काय? संबंधित घटना नेमकी का घडली, याबाबतची माहिती आता समोर येऊ लागली आहे. भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित महंमद पैगंबर आणि इस्लाम धर्म यांच्यावर अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. नुपूर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात प्रतिक्रिया देताना संबंधित वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कानपूरमध्ये काही नागरिकांनी आजचा दिवस बाजार बंदची हाक दिली होती. पण काही नागरिकांचा त्याला विरोध होता. याच मुद्द्यावरुन दोन गटांमध्ये वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारी आणि दगडफेकीत झालं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला. त्यानंतर अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडल्या. परिस्थितीत सध्या तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.