• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • कन्हैया कुमार धरणार काँग्रेसचा हात? Rahul Gandhi यांची घेतली भेट; जिग्नेश मेवाणीही पक्षप्रमुखांच्या संपर्कात

कन्हैया कुमार धरणार काँग्रेसचा हात? Rahul Gandhi यांची घेतली भेट; जिग्नेश मेवाणीही पक्षप्रमुखांच्या संपर्कात

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), गुजरात या भाजपचं वर्चस्व असणाऱ्या राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला शह देण्यासाठी कॉंग्रेसने (Congress) आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), गुजरात या भाजपचं वर्चस्व असणाऱ्या राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला शह देण्यासाठी कॉंग्रेसने (Congress) आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपनेही आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या हालचालींना वेग आल्याचं दिसत आहे. गुजरातमध्ये भाजपने भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रिपदी केलेली नियुक्ती, तर उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेसने पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांच्या नेतृत्वाखाली प्रतिज्ञा यात्रा (Pratigya Yatra) काढण्याची केलेली घोषणा हे याचेच संकेत आहेत. 'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, सीपीआय नेते (CPI Leader) आणि जेएनयू विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष (Former JNU Students Union President) कन्हैयाकुमार यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली आहे. त्यावरून कन्हैयाकुमार लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची अटकळ बांधली जात आहे. गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणीही काँग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात असल्याचं वृत्त आहे. गेल्या वेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने वडगाम मतदारसंघात पक्षातर्फे उमेदवार उभा न करता मेवाणी यांना मदत केली होती. गेल्या दोन वर्षांत ज्योतिरादित्य शिंदे, सुष्मिता देव, जितेन प्रसाद आणि प्रियांका चतुर्वेदी यांसारखे अनेक तरुण नेते कॉंग्रेसमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी कॉंग्रेस नव्या दमाच्या नेत्यांसाठी पायघड्या घालत असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. हे वाचा-‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजने’ला मोदी सरकारची मंजुरी, जाणून घ्या वैशिष्ट्यं कन्हैयाकुमार यांनी मंगळवारी (14 सप्टेंबर) राहुल गांधी यांची भेट घेतली. त्या वेळी कन्हैयाकुमार यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचं समजतं. उत्तर प्रदेशातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (UP Assembly elections) सपा (SP) आणि बसपाने (BSP) काँग्रेसशी हातमिळवणी करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पक्षाला स्वबळावर निवडणूक लढवावी लागणार आहे. अशा परिस्थितीत वक्तृत्व कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेला युवा नेता कन्हैयाकुमार काँग्रेसमध्ये सामील झाल्यास, पक्ष उत्तर प्रदेशातल्या प्रचारासाठी त्याचा प्रभावी वापर करू शकतो. कन्हैया कुमार यांची वादग्रस्त पार्श्वभूमी पाहता पक्षासाठी ते त्रासदायक ठरू शकतात, असं वरिष्ठ नेत्यांचं मत आहे. कन्हैयाकुमार यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सीपीआयच्या पाटणा कार्यालयात गोंधळ घातला होता. त्यामुळं त्यांच्यावर पक्षाने सौम्य शिस्तभंगाची कारवाई केली होती. तसंच, काँग्रेसमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैयाकुमार बिहारच्या (Bihar) राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्यास उत्सुक आहेत. बिहारमध्ये गेल्या तीन दशकांपासून काँग्रेस मागे पडली आहे. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीतही कॉंग्रेसची कामगिरी अत्यंत सुमार झाली होती. 70 पैकी केवळ 19 जागांवर कॉंग्रेसला विजय मिळवता आला होता. तिथे राजदनं (RJD) 144 पैकी निम्म्याहून अधिक जागा जिंकल्या होत्या. सीपीआयने (एमएल) 19 पैकी 12 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे कन्हैयाकुमार यांचा बिहारमध्येही कॉंग्रेसला उपयोग होऊ शकतो. हे वाचा-...म्हणून मुस्लीम पुरूष हिंदू स्त्रीशी दुसरं लग्न करू शकत नाही - उच्च न्यायालय दरम्यान, कन्हैयाकुमार यांची सीपीआयमध्ये घुसमट होत असल्याचं त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं. याबाबत सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा यांना विचारलं असता, ते म्हणाले, ‘मी देखील याबाबत ऐकलं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ते आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी चर्चेतही भाग घेतला.’ कन्हैयाकुमार आणि मेवाणी यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण होऊ शकतं, असं मानलं जात आहे. आता खरंच हे दोन्ही नेते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यांच्या प्रवेशानं कॉंग्रेसला नवी दिशा मिळते का, हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
First published: