Home /News /national /

कंगना विषय आमच्यासाठी बंद, मात्र घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर आमची नजर; राऊतांचा सूचक इशारा

कंगना विषय आमच्यासाठी बंद, मात्र घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर आमची नजर; राऊतांचा सूचक इशारा

'या प्रकरणावर सुरू असलेल्या प्रत्येक घडामोडींवर आमचं बारीक लक्ष आहे. कोण काय करतं याची आम्ही नोंद ठेवतो आहोत.'

    नवी दिल्ली 13 सप्टेंबर: कंगना प्रकरणावरून (Kangana Ranaut ) महाराष्ट्रात वादळ निर्माण झालं आहे. मात्र आता शिवसेनेने या विषयावर बोलणार नाही अशी भूमिका घेतली आहे. हा विषय आमच्यासाठी बंद झाल्याचंही म्हटलं होतं. संसदेच्या अधिवेशनासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) हे दिल्लीत पोहोचले आहेत. तिथे बोलतांना त्यांनी मात्र सूचक इशारा दिला आहे. संजय राऊत म्हणाले, कंगना रणौत प्रकरणावर आम्ही आता बोलणार नाही. मात्र या प्रकरणावर सुरू असलेल्या प्रत्येक घडामोडींवर आमचं बारीक लक्ष आहे. कोण काय करतं याची आम्ही नोंद ठेवतो आहोत. या मागे कुठला पक्ष आहे, व्यक्ती आहे, त्यांचा उद्देश काय आहे याची आम्हाला माहिती आहे असंही राऊत यांनी सांगितलं. संसदेत चीन सीमेवरचा वाद, कोरोनाची साथ, बेरोजगारी, जीएसटी असे अनेक विषय सभागृहात उपस्थित करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. महाराष्ट्र सरकारसोबत कंगनाचा सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 'माझ्यावर जो अन्याय झाला, त्यासंदर्भात मी राज्यपालांची भेट घेतली. मला न्याय मिळेल अशी आशा आहे. मी कोणी राजकारणी नाही, माझं म्हणणं राज्यपालांनी एका लेकीसारखं ऐकून घेतलं,' अशी प्रतिक्रिया या भेटीनंतर कंगनाने दिली आहे. कंगनाच्या अनधिकृत ऑफिसवर कारवाई करत मुंबई महानगरपालिकेने कंगनाला पहिला धक्का दिला होता. बीएमसी विरुद्ध कंगना अवैध बांधकाम प्रकरण सध्या सिव्हिल कोर्टात असून 25 सप्टेंबरला याबाबतची सुनावणी होणार आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Sanjay raut

    पुढील बातम्या