धमतरी, 22 जानेवारी : कबड्डी स्पर्धेदरम्यान एका खेळाडूचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्पर्धेवेळी अंतिम टप्प्यात नरेंद्र नावाचा खेळाडू, बाकी खेळाडूंखाली दबला गेला. त्यानंतर तो अचानक बेशुद्ध पडला आणि उठलाच नाही. स्पर्धेतील इतर खेळाडू त्याला घेऊन रुग्णालयात पोहचले. परंतु उपचारावेळीच त्याचा मृत्यू झाला.
छत्तीसगढमधील धमतरी जिल्ह्यातील गोजी गावात सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेवेळी ही दुर्घटना घडली. सध्या ग्रामीण भागात कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. धमतरी जिल्ह्यातील गोजी गावातही दोन दिवसीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. बुधवारी संध्याकाळी कोकडी आणि पटेवा या दोन टीममध्ये खेळ सुरू होता. त्यावेळी कोकडी टीमकडून त्यांचा सर्वोत्तम खेळाडू नरेंद्र साहू अंतिम रेडसाठी गेला. त्यावेळी पटेवा खेळाडूंनी त्याला पकडलं आणि नरेंद्र डोक्यावर पडला. नरेंद्र लाईनपर्यंत पोहचेल, या भीतीने बाकी खेळाडूंनी त्याला पकडून ठेवलं. परंतु ज्यावेळी खेळाडूंनी त्याला सोडलं, तेव्हा मात्र नरेंद्र उठलाच नाही. या घटनेबाबत छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही ट्विट करत, दु:ख व्यक्त केलं आहे.
नरेंद्र बेशुद्ध झाल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही वेळ उपचार झाले, परंतु उपचारादरम्यानच नरेंद्रचा मृत्यू झाला. नरेंद्रच्या निधनाने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे. पोस्टमार्टमनंतर त्याचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपण्यात आला आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी चौकशी सुरू केली. पोलिसांनी उपस्थितांकडे केलेल्या चौकशीनंतर गुन्हा दाखल केला आहे. हा घटना अचानक झालेली आहे, परंतु या प्रकरणी, सर्व प्रकारे चौकशी केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.