मुंबई, 29 जुलै : भारतातले द्रष्टे उद्योजक म्हणून जेआरडी टाटा यांचं नाव घेतलं जातं. देशाच्या प्रगतीत त्यांचं मोठं योगदान आहे. 29 जुलै 1904 हा त्यांचा जन्मदिवस. आज त्यांची 119वी जयंती आहे. जहांगीर रतनजी दादाभाई टाटा यांचं व्यक्तिमत्त्व आगळेवेगळं होतं. त्यांच्या जीवनातले अनेक किस्से त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाची साक्ष देतात. इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांनी अलीकडेच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये जेआरडी टाटा यांच्यासंदर्भातला स्वतःला अनुभवलेला एक किस्सा सांगितला होता. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सुधा मूर्ती यांनी हा किस्सा सांगितला होता. ‘1974 साली मी बेंगळुरूत टाटा इन्स्टिट्यूटमधून एमटेक करत होते. माझ्या वर्गात मी एकमेव मुलगी होती. 1972मध्ये मी बीई झाले, तेव्हा संपूर्ण युनिव्हर्सिटीतही मी एकटीच मुलगी होते. बाकी सगळे मुलगे होते. मला अमेरिकेत पीएचडी करण्यासाठी स्कॉलरशिप मिळत होती. मी हॉस्टेलवर येत होते, तेवढ्यात मला नोटीस बोर्डवर एक जाहिरात दिसली. टेल्को कंपनी पुणे आणि जमशेदपूरमध्ये इंजिनीअरची भरती करत होती; मात्र ‘महिलांनी अर्ज करू नये’ असं खाली लिहिलेलं होतं. ‘सिगारेट आरोग्यासाठी हानिकारक असते,’ असं सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं, तसंच हे मला वाटलं. आता मला फार राग येत नसला, तरी तेव्हा मी 22-23 वर्षांची होते आणि राग खूप यायचा. त्यामुळे त्या रागात मी जेआरडी टाटांना पत्र लिहिलं होतं.’ सुधा मूर्ती यांनी सांगितलं, ‘जेआरडी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये दर वर्षी येत असल्याने त्यांना आम्ही दुरून पाहायचो. मध्यमवर्गीय पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी असल्याने तेव्हा अशा मोठमोठ्या व्यक्तींशी जवळ जाऊन बोलायचा धीर नव्हता. जेआरडी टाटा खूप हँडसम होते. मी त्यांना पत्र लिहिलं. त्यात लिहिलं, ‘सर जेआरडी टाटा, देश स्वतंत्रही झाला नव्हता, तेव्हा तुमचा ग्रुप सुरू झाला आहे. केमिकल, लोकोमोटिव्ह, आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीत तुमच्या ग्रुपचं काम आहे. तुम्ही कायमच काळाच्या पुढचा विचार केलात. समाजात महिला आणि पुरुष या दोघांचं स्थान समान असतं. महिलांना संधी मिळाली नाही, तर महिलांना सेवा करण्याची संधी मिळणार नाही. म्हणजेच देशाची प्रगती होणार नाही. कधी त्यांना शिक्षण मिळत नाही, तर कधी त्यांना नोकरीची संधी नाहीये. असा समाज आणि असा देश कधी प्रगती करू शकत नाही. महिलांना संधी न देणं ही तुमच्या कंपनीची चूक आहे.’ वाचा - ऐकावं ते नवलच! दातांनी ओढलं विमान अन् जहाज; भारतीय महिलेनं नोंदवला जागतिक विक्रम सुधा मूर्ती यांनी पत्र तर लिहिलं, पण त्यांना जेआरडी टाटांचा पत्ता माहिती नव्हता. त्यामुळे त्यांनी ‘जेआरडी टाटा, टेल्को, बॉम्बे’ एवढंच लिहून पोस्टकार्ड पाठवलं. जेआरडी टाटा हे खूप बडं व्यक्तिमत्त्व होतं. त्यांना ते पत्र मिळालं. ते वाचून त्यांना राग आला. सुधा मूर्ती यांनी सांगितलं, ‘पत्र वाचल्यावर त्यांनी एका कर्मचाऱ्याला बोलावलं आणि सांगितलं, की ‘एक मुलगी हे विचारतेय आणि हा अन्याय आहे. तिला एक संधी द्यायला हवी. तिने चांगली कामगिरी केली नाही, तर आपण तिला फेल करू.’ तेव्हा मी लेडीज हॉस्टेलमध्ये होते. तिथे मला तार मिळाली. मला पुण्यात टेल्कोमध्ये फायनल इंटरव्ह्यूसाठी बोलावलं होतं. ट्रेनच्या फर्स्ट क्लासच्या तिकिटाचा खर्च ते करणार होते. तेव्हा पुणे-बेंगळुरूदरम्यान विमानसेवा नव्हती. ही 1974ची गोष्ट आहे. माझ्या सगळ्या मैत्रिणी पीएचडी करत होत्या. त्यांनी सांगितलं, की आम्ही सगळ्या जणी मिळून 30 रुपये गोळा करतो आणि एक साडी तुला घेऊन देतो. पुण्यात खूप चांगल्या साड्या मिळतात. मी पुण्यात गेले. मी टेक्निकली खूप चांगली होते. त्यामुळे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली.’ पुढे सुधा मूर्ती म्हणाल्या, ‘तेव्हा मी त्यांना विचारलं, की तुम्ही महिलांना संधी का देत नाही आहात? तेव्हा जेआरडींनी सांगितलं होतं, ‘बेटा, समजून घे. तू खूप चांगली इंजिनीअर आहेस; पण आमचा एक प्लांट जमशेदपूरला, तर एक प्लांट पुण्यात आहे. तिथे आतापर्यंत एकही मुलगी नाही. तिथे शिफ्ट्समध्ये काम चालतं. पुरुषांसोबत काम करावं लागतं. अन्यथा आर अँड डी किंवा पीएचडी करताना एकत्र काम करू शकता.’ मी त्यांना सांगितलं, ‘माझे आजोबा इतिहासाचे शिक्षक होते. ते सांगायचे, की 10 हजार पावलांचा प्रवास नेहमी एका पावलापासून सुरू होतो. त्यामुळे असाच विचार करत राहिलात, तर जगात कधीच मुली पुढे येऊ शकणार नाहीत. एक ना एक दिवस तरी त्यांना पुढे यावंच लागेल. त्यामुळे तुम्हाला हे सुरू करावं लागेल.’ त्यानंतर मला तिथे नोकरी मिळाली.’ हा मोठा बदल टाटा ग्रुपमध्ये घडला. हा प्रसंग घडल्यानंतर आठ वर्षांनी एकदा बॉम्बे हाउसच्या पायऱ्यांवर जेआरडींची सुधा मूर्तींशी गाठ पडली. तेव्हा सुधा मूर्ती एकट्याच होत्या, रात्र होऊ लागली होती आणि त्यांचे पती त्यांना न्यायला आले नव्हते. हे पाहून जेआरडींना काळजी वाटली. त्यामुळे नारायण मूर्ती त्यांना न्यायला येईपर्यंत जेआरडी त्यांच्याशी उभे राहून सुधा मूर्तींशी गप्पा मारत राहिले होते. इतकं साधं होतं त्यांचं व्यक्तिमत्त्व. महान माणसांचं हेच वेगळेपण असतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.